पत्नीने परवानगी न घेता खरेदी केला मोबाईल, संतापलेल्या पतीने दिली हत्येची सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 02:46 PM2022-01-24T14:46:05+5:302022-01-24T14:49:13+5:30
Kolkata Murder News: या घटनेनंतर सुपारी किलर आणि आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
कोलकाता: अनेकदा पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन वाद होतात. काहीवेळा हा वाद मोबाईलमुळे होतो. पण हाच स्मार्टफोन एका जोडप्याच्या भांडणाचे इतके मोठे कारण बनला की, पत्नीला मारण्यासाठी पतीने एका कॉन्ट्रॅक्ट किलरला पत्नीची सुपारी दिली. पण, या घटनेत महिला थोड्यात बचावली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे घडली आहे. कोलकात्याच्या हद्दीत असलेल्या नरेंद्रपूरमध्ये राहणारा 40 वर्षीय व्यक्ती आपल्या पत्नीवर रागावला होता. त्याचे कारण म्हणजे पत्नीने त्याच्या परवानगीशिवाय स्वतःसाठी स्मार्टफोन खरेदी केला. मात्र, या संपूर्ण घटनेनंतर मारेकरी आणि आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय झालं ?
पोलिसांनी सांगितले की, कोलकाता येथील नरेंद्रपूर येथे 40 वर्षीय व्यक्ती आपल्या पत्नीसोबत राहत होता. त्याच्या पत्नीने काही महिन्यांपूर्वी आपल्या पतीकडे नवीन स्मार्टफोनची मागणी केली होती. पण पतीने नवीन स्मार्टफोन घेण्यास नकार दिला. यानंतर महिलेने स्वतः जमवलेल्या पैशातून नवऱ्याच्या परवानगीशिवाय नवीन स्मार्टफोन घेतला. नवीन स्मार्टफोन घेतल्याने पत्नी खूश होती, मात्र पतीला याची माहिती मिळताच त्याने पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली.
थोडक्यात वाचला महिलेचा जीव
गुरुवारी रात्री पती घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेला आणि परतलाच नाही. यानंतर पत्नीला संशय आल्याने ती पतीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडली. यावेळी दबा धरुन बसलेल्या सुपारी किलरने महिलेवर हल्ला केला. मारेकऱ्यांपैकी एकाने महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. यादरम्यान तिच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. पण, महिलेची आरडाओरड ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले आणि तिला रुग्णालयात नेले. यावेळी लोकांनी आरोपी पती आणि भाडोत्री मारेकऱ्याला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले.