कोकण रेल्वे गेटमनची गोळी झाडून हत्या; रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 09:06 IST2023-08-22T09:06:44+5:302023-08-22T09:06:55+5:30
गेटमन चंद्रकांत कांबळेंची हत्या करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध सुरू

कोकण रेल्वे गेटमनची गोळी झाडून हत्या; रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग/रोहा: कोकण रेल्वेच्या गेटमनची डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळील तिसे येथील रेल्वे फाटकाजवळ सोमवारी घडली. चंद्रकांत कांबळे असे हत्या झालेल्या गेटमनचे नाव आहे.
कोलाड महाबळे पाले गावातील ते रहिवासी आहेत. या घटनेनंतर पोलिस तसेच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र हल्लेखोराला अटक होईपर्यंत मृतदेह हलवू नये, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता. अखेर नातेवाईकांची समजून काढल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.
चंद्रकांत कांबळे हे नेहमीप्रमाणे सोमवारी तिसे येथील रेल्वे गेटवर कामावर हजर झाले होते. दुपारी ते जेवणास बसले होते. त्याचवेळी मागून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात गोळी मारली. त्यानंतर हल्लेखोर फरार झाला. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर कोलाड पोलिस व रेल्वे पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला.
हल्ल्याचे कारण अस्पष्ट- चंद्रकांत कांबळे यांची हत्या का केली, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू आहे.