माहिती अधिकार कार्यकर्त्यांस मदत करणाऱ्या तिघांना अटक; २ कोटी रुपये व भुखंडाची मागणी प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 09:07 PM2020-07-21T21:07:24+5:302020-07-21T21:09:48+5:30
बांधकाम व्यावसायिकास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी
पुणे : बांधकाम व्यावसायिकास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन २ कोटी रुपये व भुखंडाची मागणी करण्याच्या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्त्याला पळून जाण्यास मदत केल्या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी तिघांना अटक केली.
विशाल शिवाजी ढोरे (वय ३६), अस्लम मंजूर पठाण (वय २४, दोघे रा़ मांजरी, हडपसर) आणि सिद्धार्थ महिंद्र डांगी (वय २८, रा़ उत्कर्ष सोसायटी, कात्रज) अशी या तिघांची नावे आहेत.
सुधीर कर्नाटकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोथरुड पोलिसांनी पत्रकार देवेंद्र जैन, संबंधित महिला व बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना अटक केली होती़ त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या गुन्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे , अमोल चव्हाण हे फरार झाले आहेत. कोथरुड पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये या तिघांनी बऱ्हाटे यांना पळून जाण्यास मदत केली. त्यांना नवीन सीम कार्ड खरेदी करुन दिले़ तसेच हे तिघे व बऱ्हाटे हे ८ जुलै रोजी लक्ष्मी कॉलनीत भेटले. तेथून त्यांनी बऱ्हाटे यांना सोलापूरला नेले. तेथे अमोल नावाच्या व्यक्तीच्या घरात ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. तिघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. बऱ्हाटे यांचा ठाव ठिकाणा या तिघांना माहिती आहे. त्यांना पनवेल, लोणावळा आणि सोलापूर या ठिकाणी या तिघांनी लपविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी वापरलेल्या गाड्याही जप्त करायच्या आहेत, यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली़ न्यायालयाने तिघांना २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
..........................
मालकीहक्क नसताना शहरातील विविध ठिकाणी जमीन विक्रीस उपलब्ध असल्याचे सांगत 20 लाख रुपयांची फसवणूक केली. प्रकरणात बडतर्फ पोलिस शैलेश जगतापसह प्रकाश फाले यांची दोन दिवसांसाठी (23 जुलैपर्यत) पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.