कुरुलकरचे महिलेशी विवाहबाह्य संबंध, तक्रार केल्यास अडचणीत भर पडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 07:38 AM2023-07-12T07:38:56+5:302023-07-12T07:39:23+5:30
दोघांतील चॅटिंग तपास यंत्रणेला मिळाल्याचे दोषारोपपत्रात नमूद, प्रदीप कुरुलकरला सध्या २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा एटीएसने केलेल्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत
पुणे - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा संचालक (डीआरडीओ) डॉ. प्रदीप कुरुलकरच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ताशी ‘बेब’ म्हणून चॅटिंग करणाऱ्या कुरुलकरबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रदीप कुरुलकरचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे उघडकीस आले असून, त्या दोघांमध्ये झालले चॅटिंग तपास यंत्रणेला मिळाले आहे, असे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात नमूद केले आहे. यामुळे कुरुलकर आणखी अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, याबाबत महिलेने अद्याप पोलिसात कोणतीही तक्रार दिलेली नाही. याबाबत तिने तक्रार दिल्यास डॉ. कुरुलकर याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात एका किंवा त्यापेक्षा जास्त कलमांची वाढ होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी हेरांच्या जाळ्यात अडकून देशाच्या संरक्षण क्षेत्राशी निगडित गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली डॉ. कुरुलकर याला दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली. हे प्रकरण उघडकीला आले तेव्हा संपूर्ण संरक्षण दलात एकच खळबळ उडाली होती. प्रदीप कुरुलकरला सध्या २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा एटीएसने केलेल्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या दोन हजार पानांच्या दोषारोपपत्रात त्या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
७० हून अधिक जणांचे जबाब
पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ताशी ब्राह्मोस, अग्नी ६, सरफेस टू एअर मिसाइल यासंबंधीची चॅटिंगद्वारे माहिती पुरविल्याचे उघडकीस आल्यानंतर आता कुरुलकरचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे या प्रकरणी दाखल असलेल्या दोषारोपपत्रातून पुढे येत आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणात आतापर्यंत ७० हून अधिक जणांचे जबाब नोंदवून गोपनीय कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत.