लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेतले; इंटरनेट कॅफेच्या चालक, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By विलास जळकोटकर | Published: July 7, 2024 10:25 PM2024-07-07T22:25:54+5:302024-07-07T22:26:43+5:30
सात रस्ता परिसरातील प्रकार, शासन देणार प्रति अर्जासाठी ५० हजार रुपये
विलास जळकोटकर, सोलापूर: शासनाकडून राज्यात ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही योजना राबवत आहे. या योजनेसाठी लाभार्थी महिलांकडून कोणतीही रक्कम न आकारता फार्म भरुन देणे अपेक्षित आहे मात्र, १०० ते २०० रुपये आकारल्याने सात रस्ता परिसरातील दोन नेट कॅफे चालक-मालकांविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हे नोंदले आहेत. या प्रकरणी मंडल अधिकारी सारिका कल्याण वाव्हळ (नोकरी, उत्तर तहसील कार्यालय,सोलापूर) यांनी फिर्याद दिली. प्रगती नेट कॅफे व योगेश्वर नेट कॅफेचे चालक-मालक अशी गुन्हा नोंदलेल्या कॅफेची नावे आहेत. सदर बझार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) ३१८ (२), ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
फिर्यादीदीत म्हटले आहे की, राज्य शासन मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना ही योजना राज्यात सर्वत्र राबवत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना १५०० रुपये शासन देणार आहे. या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरत असताना महा-ई-सेवा केंद्र अथवा नेट कॅफे यांनी कोणतेही शुल्क न आकारता मोफत अर्ज भरून महिला लाभार्थ्यांना सहकार्य करण्याबाबत शासन निर्देश दिले आहेत. शासन संबंधित सेवा केंद्राला प्रति अर्ज पन्नास रुपये शुल्क देणार आहे.असे असताना सात रस्ता परिसरातील दोन नेट कॅफे चालकांनी लाभार्थी महिलाकडून शंभर व दोनशे रुपये शुल्क आकारल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सदर बझार पोलिसांनी संबंधित नेट कॅफे चालकाविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला असून, तपास फौजदार शिंदे करीत आहेत.
----
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जिल्ह्यातील प्रत्येक महा-ई-सेवा केंद्र व नेट कॅफेवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. कोणीही या योजनेचे अर्ज भरण्यास संबंधित महिला लाभार्थ्याकडून कोणतेही शुल्क घेऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
----
खबर मिळाली अन् गुन्हे दाखल
सात रस्ता परिसरातील नमूद दोन्ही कॅफेमध्ये ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांकडून शंभर ते तीनशे रुपये आकारले जात असल्याची माहिती गुप्तवार्ता विभागाकडून सोलापूर उत्तरचे प्रांत अधिकारी सदाशिव पडणे यांना मिळाली. प्रांताधिकारी सदाशिव पडदूणे यांनी उत्तरच्या तहसिलदाराना यांना सूचना केल्याने शहानिशा करुन गुन्हे नोंदले गेले.