गडहिंग्लजनजीक अपघातात डॉक्टर तरुणी जागीच ठार; कंटेनरची दुचाकीला समोरून धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 09:10 PM2022-06-26T21:10:48+5:302022-06-26T21:11:06+5:30
धडकेत तिच्या डोक्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
गडहिंग्लज- चंदगड मार्गावरील भडगावनजीक मालवाहू कंटेनरने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार डॉक्टर तरुणी जागीच ठार झाली.उमा मार्तंड जरळी ( वय २६,मूळगाव मुत्नाळ ता.गडहिंग्लज सध्या रा.संकेश्वर)असे मृत तरूणीचे नाव आहे.याप्रकरणी कंटेनर चालक प्रकाश नाना पाटील (रा.वडजी, भडगाव,जि.जळगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी(२६) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, डॉ. उमा ही गेल्या काही महिन्यांपासून महागाव येथील संत गजानन महाराज ग्रामीण रुग्णालयात नोकरीला होती.
रविवारी सकाळी ती आपल्या दुचाकीवरून (एम.एच.०९-एफ. एन.२३९४) संकेश्वरहुन महागावकडे कामावर जात होती.दरम्यान, भडगावनजीक शंकर हिरेकुडे यांच्या शेतानजीकच्या वळणावर चंदगडकडून भरधाव येणाऱ्या मालवाहू कंटेनरने ( एम.पी.०९-जी.जी.७५३८)तिच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
धडकेत तिच्या डोक्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.तिच्या पश्चात आई - वडील,भाऊ असा परिवार आहे.
भारतीय किसान मोर्चाचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष मार्तंड जरळी व मुत्नाळच्या माजी सरपंच माधवी जरळी यांची ती मुलगी होय.भीमा जरळी यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.
मुत्नाळ गावावर शोककळा!
उमा ही अत्यंत हुशार व मनमिळाऊ होती. गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयातून तिने बी.एच.एम.एस.पदवी घेतली होती. कोरोना कालावधीत तिने मुंबई येथील दवाखान्यात वर्षभर नोकरी केली.त्यानंतर अलिकडेच ती महागाव येथील दवाखान्यात रूजू झाली होती.तिच्या अकाली मृत्यूने जरळी कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून मुत्नाळ गावावर शोककळा पसरली आहे.