Lakhimpur Kheri Case : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगाच मुख्य आरोपी, ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 08:23 PM2022-01-03T20:23:52+5:302022-01-03T20:26:58+5:30
Lakhimpur Kheri Case : या प्रकरणात मुख्य आरोपी आशिष मिश्रासह सर्व १३ आरोपी तुरुंगात आहेत. पोलिसांनी आरोपपत्रात वीरेंद्र शुक्ला या नव्या नावाचा समावेश केला आहे.
लखनऊ - देशभर खळबळ उडवून देणाऱ्या लखीमपूर हिंसाचार प्रकरणी चौकशी करत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज एकूण १४ आरोपींविरुद्ध लखनऊ कोर्टात ५ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू याला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. घटना घडली तेव्हा आशिष घटनास्थळी होता, असे एसआयटीने आरोपपत्रात नमूद केले आहे.
लोखंडी पेटीत ५ हजार पानांचे आरोपपत्र घेऊन एसआयटीची टीम लखनऊ न्यायालयात पोहोचली. आरोपपत्रात पोलिसांनी आशिष मिश्रा यांच्या आणखी एका नातेवाईकालाही आरोपी केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र शुक्ला यांच्यावर पुरावे लपवल्याचा आरोप आहे. आशिष मिश्रा यांच्या जीपच्या मागे धावणाऱ्या दोन वाहनांपैकी एक वीरेंद्रची स्कॉर्पिओ होती. आधी शुक्लाने आपली स्कॉर्पिओ लपवली आणि दुसऱ्याची गाडी दाखवली.
आशिष मिश्रा यांच्या शस्त्रांनी गोळीबार
एसआयटीने आपल्या तपासात लखीमपूर हिंसाचारात आशिष मिश्रा याने शस्त्रांनी गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. आशिष मिश्रा यांच्या रिव्हॉल्व्हर आणि रायफलमधूनही गोळीबार करण्यात आला. आशिष मिश्रा आणि अंकित दास परवानाधारक शस्त्रांनी गोळीबार करत होते, असे एसआयटीने आरोपपत्रात म्हटले आहे. तर आशिष मिश्रा म्हणाले होते की, 1 वर्षापासून त्यांच्या शस्त्रांमधून गोळीबार झाला नाही. बॅलेस्टिक अहवालाच्या आधारे पोलिसांनी गोळीबाराला दुजोरा दिला आहे.
या प्रकरणातील १३ आरोपी तुरुंगात आहेत
या प्रकरणात मुख्य आरोपी आशिष मिश्रासह सर्व १३ आरोपी तुरुंगात आहेत. पोलिसांनी आरोपपत्रात वीरेंद्र शुक्ला या नव्या नावाचा समावेश केला आहे. वीरेंद्रवर कलम 201 अंतर्गत पुरावे नष्ट करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. वीरेंद्र हे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मेहुणा आहे आणि पालिया ब्लॉकचे सध्याचे ब्लॉक प्रमुख आहेत.
3 ऑक्टोबर रोजी हिंसाचार झाला होता
३ ऑक्टोबर रोजी लखीमपूरमधील तिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू याने आपल्या जीपने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. यानंतर संतप्त जमावाने आशिषच्या चालकासह चार जणांची हत्या केली.
याप्रकरणी एसआयटीचा अहवाल नुकताच समोर आला आहे. यामध्ये लखीमपूरच्या तिकुनिया येथील हिंसाचार हा अपघात किंवा निर्घृण हत्या नसून हत्यार घेऊन गंभीर कट रचून खुनाच्या प्रयत्नाची घटना असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तपास अधिकाऱ्यांच्या मागणीवरून कोर्टाने आशिष मिश्रा यांच्याविरोधात आणखी कडक कलमे लावली आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.