लखीमपूर खेरीतील मुख्य आरोपी आशिष मिश्रानं केलं सरंडर, सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला होता जामिन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 06:30 PM2022-04-24T18:30:42+5:302022-04-24T18:31:34+5:30
लखीमपूर हिंसेचा मुख्य आरोपी आशिष मिश्रानं सरंडर केलं आहे. त्याला अलाहाबाद न्यायालयानं दिलेला जामिन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला होता.
उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि लखीमपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी अशिष मिश्रानं लखीपूरच्या न्यायालयात सरंडर केलं आहे. सरंडर केल्यानंतर लखीमपूर पोलिसांनी आशिष मिश्राची रवानगी तुरूंगात केली. आशिष मिश्राला अलाहबाद न्यायालयानं जामिन मंजूर केला होता. परंतु नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं.
सर्वोच्च न्यायालयानं गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आणि लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्राला देण्यात आलेला जामिन रद्द केला होता. समोर आलेल्या माहितीनुसार आशिष मिश्रानं रविवारीच सरंडर केलं. त्यानं सीजेएमच्या न्यायालयात जाऊन सरंडर केल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयानं त्याला दिलेली मुदत २५ एप्रिल रोजी संपणार होती.
हिंसाचारातआठजणांचामृत्यू
लखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी तिकोनिया निघासन विधानसभा मतदारसंघात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आशिष याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.
२०८जणांनीनोंदवलीसाक्ष
तपासात, एसआयटीला १७ वैज्ञानिक पुरावे, सात भौतिक पुरावे आणि २४ व्हिडिओ फोटो सापडले, ज्यामुळे आरोपींच्या अडचणी वाढल्या. याशिवाय २०८ जणांनी साक्ष दिली. या आधारे एसआयटीने आरोपपत्र दाखल केले. मंत्र्यांचा मुलगा आशिष घटनास्थळी उपस्थित असल्याचे साक्षीदारांनी एसआयटीला सांगितले. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.