बदली हवीय? तर बायकोला माझ्याकडे पाठव! JEच्या मागणीनं त्रस्त झालेल्या लाईनमनची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 12:04 PM2022-04-11T12:04:39+5:302022-04-11T12:06:50+5:30
पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं; लाईनमॅनचा उपचारादरम्यान मृत्यू
लखीमपूर खिरी: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये एका लाईनमननं आत्महत्या केली आहे. बदली करण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यानं पत्नीला त्याच्याकडे पाठवण्यास सांगितलं होतं, असा आरोप लाईनमननं केला. त्यामुळे त्रस्त झालेल्या लाईनमननं पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं.
पलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वीज उपकेंद्रात वास्तव्यात असलेल्या लाईनमन गोकुळ प्रसाद यांनी कनिष्ठ अभियंता नागेंद्र कुमार यांच्याकडून असलेल्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. वीज विभागाचे अधिकारी गेल्या ३ वर्षांपासून गोकुळ यांची वारंवार बदली करत होते. त्यामुळे गोकुळ प्रसाद त्रस्त होते. त्यांनी पलिया विद्युत उपकेंद्र कार्यालयाबाहेर स्वत:वर पेट्रोल टाकलं आणि आग लावली.
गोकुळ प्रसाद यांना वाचवण्याचा प्रयत्न तिथे उपस्थित असलेल्या कोणीही केला नाही. घटनेची माहिती मिळताच गोकुळ प्रसाद यांचे कुटुंबीय तिथे पोहोचले. त्यांनी गोकुळ यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून त्यांना लखनऊला हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोकुळ यांच्या मृत्यूनं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
मृत्यूआधी पोलिसांनी गोकुळ प्रसाद यांचा जबाब नोंदवला. तुझी बदली करतो, त्या बदल्यात तुझ्या पत्नीला माझ्याकडे पाठव, असं नागेंद्र कुमार यांनी म्हटलं होतं. त्यामुळे धक्का बसल्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं गोकुळ यांनी पोलिसांनी सांगितलं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन लखीमपूर खिरीचे डीएम महेंद्र बहादूर सिंह यांनी नागेंद्र कुमार यांना निलंबित केलं आहे. गोकुळ प्रसाद यांच्या कुटुंबानं रात्री उशिरा नागेंद्र कुमार आणि अन्य कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.