पंचतारांकित हॉटेलात नोकरी लावण्याच्या आमिषाने लाखोंचा गंडा; दुकली अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 08:23 PM2019-01-31T20:23:24+5:302019-01-31T20:24:40+5:30
पायधुनी पोलिसांनी नोएडा, उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे. भगीरथ त्यागी (२८) आणि झाकीर हुसेन (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मुंबई - उच्च शिक्षीत तरुणाला परदेशातील पंचतारांकित हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २ लाख ८५ हजारांची फसवणूक करणाऱ्या दुकलीचा पायधुनी पोलिसांनी नोएडा, उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे. भगीरथ त्यागी (२८) आणि झाकीर हुसेन (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
यातील फिर्यादी शामरोझ नदीम पठाण (२९) हा तरुण दुबई येथे काही वर्षे काम करून परत भारतात आला होता. हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या शामरोझ हा परदेशातील पंचतारांकित हॉटेलमध्ये काम मिळवण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी त्याने नोकरी मिळवून देणाऱ्या वेबसाईटला माहिती दिली होती. मात्र यातील आरोपींनी खोटे ई मेल अॅड्रेस, खोटी वेबसाईड बनवून शामरोझसारख्या गरजू तरुणांना नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा गोरखधंदा सुरू केला होता. शामरोझ याचा अर्ज आरोपींनी वेबसाईटवर पाहिल्यानंतर त्याला वेगवेगळ्या फोन क्रमांकावरून संपर्क करून त्याला सौदी अरबमधील जे डब्ल्यू मेरिएट या हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी देतो, असे आश्वासन दिले. मात्र त्यांनी यासाठी प्रोसेसिंग फी, विमानाची तिकीट, व्हिसा यासाठी २ लाख ८५, ३०० रुपये बँक खात्यात टाकायला लावले. मात्र शेवटी आरोपींनी नोकरीसाठी ७१, ८९६ रुपये जीएसटीच्या नावाखाली मागितल्याने शामरोझ याला त्यांचा संशय आला. त्याने या प्रकरणाची तक्रार पायधुनी पोलिसांत करताच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक तपासात यातील आरोपी हे उत्तर प्रदेश, नोएडा, झाशी येथील असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलीस पथकाने त्या ठिकाणी धाव घेऊन दोघा आरोपींना अटक केली असून त्यांची महिला साथीदार फरारी आहे.