भक्तांवर आसूड ओढून उकळले लाखो रुपये, नाशिकमध्ये ‘बडे बाबा’ला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 04:30 AM2020-12-21T04:30:25+5:302020-12-21T07:00:36+5:30
Crime News : धगधगत्या निखाऱ्यांवरून चालणे, सप्ताह भरविणे, देव-देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करणे यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांतून या बडे बाबाने लोकांचा विश्वास संपादन केला.
नाशिक : भोळ्याभाबड्या भक्तांच्या शरीरावर चाबकाचे आसूड ओढत बनावट सोन्याच्या विटा दाखवून हजारो ते लाखो रुपयांची रोकड लाटणाऱ्या ‘बडे बाबा उर्फ पाथर्डीवाला’ गणेश जयराम जगताप (३७) याने वडाळा-पाथर्डी रस्त्यावर ‘श्रद्धा व्हिला’मध्ये आलिशान आश्रम थाटला आहे. या भोंदूबाबाने नाशिकसह औरंगाबाद, लातूरमधील काही नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर येत असून, या बाबाला नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत.
धगधगत्या निखाऱ्यांवरून चालणे, सप्ताह भरविणे, देव-देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करणे यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांतून या बडे बाबाने लोकांचा विश्वास संपादन केला. ‘माझ्या ताब्यात दैवी शक्ती आहे. मी तुम्हाला जमिनीतून सोने काढून देतो आणि पैशांचा पाऊस पाडतो. माझी बड्या राजकीय लोकांसोबत गट्टी आहे, तुमच्या मुलांना सरकारी नोकऱ्या लावून देतो’, असे सांगून त्याने अहमदनगर, नांदेड, सोलापूर, लातूर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, पुणे, अमरावतीसह राज्यात मोठ्या उद्योजकांनाही गळाला लावले. त्याने स्थानिक गुंडांना हाताशी धरून अघोरी कृत्य करत अनेकांची फसवणूक केली आहे. स्वत:च्या नावापुढे श्री श्री १००८ महंत गणेशानंदगिरीजी महाराज असे लिहून अनेकांना गंडा घातला. बडे बाबा मच्छिंद्रनाथ नावाने ट्रस्टही स्थापन केला. गणेश जगतापविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी निवेदनाद्वरे केली आहे.
पूजाविधी अन् चमत्कार
आशेवाडीतील मळ्यामध्ये चमत्काराच्या नावाखाली एका रानऔषधीचा वापर करत त्याचे मंजन स्वत:च्या दातावर तो लावत असे. त्याच्या उग्रवासामुळे समोरची व्यक्ती भान हरपायची आणि बाबा जे बोलेल त्यास होकार द्यायची.
सुमारे आठ लाेकांना १९ लाखांना गंडा घातला. सोलापूरच्या विजयकुमार डिगेंकडून ७६ लाख रुपये उकळले. त्यांना बनावट सोन्याची बिस्किटे दिली. त्याची तक्रार दिल्याचे श्रीमंत बागल (लातूर) यांनी सांगितले.
व्यवस्थापक ते ‘बडे बाबा’
नाशिकमधील मंडप व्यावसायिकाकडे पूर्वी व्यवस्थापक म्हणून तो नोकरीला होता. दैवी शक्ती असल्याचे भासवून २०१२ पासून त्याने जाळे पसरविले. विश्वासू महिला सेवेकऱ्यांच्या नावाने त्याने बँकांमध्ये खाती उघडली आहेत.