मुंबईतून लाखोंच्या बनावट नोटा जप्त, तामिळनाडूतून आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 03:00 PM2020-03-10T15:00:25+5:302020-03-10T15:01:43+5:30
१ लाख २८ हजार ६०० रुपयांच्या एकूण १५१ बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या.
मुंबई - मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष - ४ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांना ३ मार्चला सायन सर्कल येथील बँक ऑफ बडोदाच्या बाजूला एक इसम बनावट भारतीय चलनातील नोटा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला आणि कारवाईत भास्कर मुर्गन नाटर (४३) याची अंगझडती घेतली. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या ताब्यातून २ हजार, पाचशे आणि दोनशेच्या रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. १ लाख २८ हजार ६०० रुपयांच्या एकूण १५१ बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या.
याबाबत सायन पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४८९ (ब) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत हस्तगत करण्यात आलेल्या बहुतांश नोटांचे सिरीयल नंबर एकच असल्याचे दिसून आले होते. काही ठराविक नोटांचा वापर करून त्यावरून इतर बनावट नोटा बनवल्या जात असाव्यात असा संशय होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी भास्कर नाटर यांच्याकडे बारकाईने चौकशी केली असता त्याच्याविरुद्ध अँटॉप हिल पोलीस ठाण्यात २०११ साली भा. दं. वि. कलम ३९३, ४५२, ३४ अन्वये गुन्हा दाखल होता असल्याची माहिती उघड झाली. तो मुंबईस येण्यासाठी निघाला असताना बनावट नोटा तामिळनाडूतील सर्वनन वनियार याने मुंबईतील एका इसमाला देण्यासाठी त्याच्याकडे दिल्या असल्याची माहिती त्याने तपासात दिली.
आरोपीने दिलेल्या माहितीवरून कक्ष - ४ चे एक पथक तामिळनाडूत दाखल झाले. तामिळनाडूतील अय्यानुर, तालुका अंबूर, जिल्हा तिरुपूथुर येथे सर्वनन (४५) याच्या राहत्या घरी या पोलीस पथकाने धड टाकली. त्यावेळी त्याच्याकडे ५०० रुपयांच्या १४७६ आणि २०० रुपयांच्या ८५ नोटा असा ऐकून ७ लाख ५५ हजार किंमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या. याप्रकरणी यापूर्वी हस्तगत केलेल्या १ लाख २८ हजार ६०० रुपयांच्या नोटा मिळून आतापर्यंत ८ लाख ८३ हजार ६०० रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या.
तामिळनाडूत टाकलेल्या छाप्यात बनावट नोटा तयार कारण्यासाटःई वापरण्यात येणारे एक स्कॅनर कम प्रिंटर, पेपर कटर, कात्री, हिरवट रंगाचा प्लास्टिक रोल इत्यादी साहित्य मिळून आले. आरोपी भारतीय चलनातील नोटा स्कॅन करून त्यांच्या प्रिंट आउट्स घेत असल्याचे आणि त्यानंतर हिरवट रंगाच्या प्लास्टिक रोलचे तुकडे नोटेवर चिटकवून सिक्युरिटी थ्रेड तयार करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. भास्कर आणि सर्वनन हे दोघेही तामिळनाडूचे राहणारे आहे.