लकडावालाने खाल्ली बिर्याणी; दोन पोलिसांचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:15 PM2019-04-18T16:15:52+5:302019-04-18T16:19:49+5:30
दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मुंबई - खंडाळा येथे ५० कोटी रुपयांच्या जमिन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाने खालेली बिर्याणी आर्थिक गुन्हे शाखेतील (इओडब्ल्यू) दोन पोलीस अधिकाऱ्यांना महागात पडली. दरम्यान, कायदेशीर कारवाईसाठी लकडावालाला घरी नेण्यात आले होते. त्यानंतर घरी बिर्याणी खाण्यास आणि दाढी करण्यास परवानगी दिल्याने दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे समोर आले आहे.
बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने खंडाळा येथील चार एकर (५० कोटी किंमतीची) जमीन बळकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाविरोधात (७४) गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यात लकडावाला देशसोडून लंडनला पळ काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गुजरातमधून त्याला अटक करण्यात आली. लकडावालाने मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्र दाखल केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयाकडूनच इओडब्ल्यूकडे तक्रार करण्यात आली होती.
या गुन्ह्यात कागदोपत्री तपासासाठी दोन दिवसांपूर्वी इओडब्ल्यूच्या पोलिसांनी लकडावाला याला त्यांच्या कार्टर रोड येथील घरी नेले होते. घरात पोलिसांची झाडाझडती सुरू असताना लकडावालाच्या कुटुंबियांनी त्याला बिर्याणी खाण्यास देण्याची विनंती केली. त्यानुसार दोन्ही अधिकाऱ्यांनी त्याला बिर्याणी खाण्यास परवानगी दिली. याच दरम्यान लकडावाला शौचालयात गेला असता. त्याने चेहऱ्यावर उगवलेली दाढीही काढली. इओडब्ल्यूच्या कार्यालयात आणल्यानंतर लकडावालाच्या चेहऱ्यावर उगवलेली दाढी वरिष्ठांना दिसली नाही. त्यावेळी चौकशीत हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वरिष्ठांनी पोलीस कर्मचारी विलास राठोड आणि संदीप सावंत या दोन अधिकाऱ्यांवर निलंबंनाची कारवाई करण्यात आली आहे.