वृद्ध महिलेचे दागिने लंपास प्रकरण : चोरीप्रकरणी महिलेसह सोनाराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 03:33 AM2019-06-27T03:33:48+5:302019-06-27T03:35:32+5:30
वृद्धेच्या घरातून लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याप्रकरणी शेजारच्याच विंगमधील महिलेसह सोनाराला गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ११ ने ही कारवाई केली आहे.
मुंबई : वृद्धेच्या घरातून लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याप्रकरणी शेजारच्याच विंगमधील महिलेसह सोनाराला गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ११ ने ही कारवाई केली आहे.
रुचिता सचिन तना (३८) आणि दीपक हस्तीमल साकरिया (४३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यात रुचिता ही मुख्य आरोपी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून, २०१९ रोजी चारकोप पोलीस ठाण्यात एका वृद्धेने त्यांच्या कपाटामधून साडे पाच लाखांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, चारकोप पोलिसांसह गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष ११ चे प्रमुख चिमाजी आढाव यांचे पथकही याचा शोध करत होते. तपासादरम्यान यात रुचिताचा हात असल्याचे उघड झाले आणि तिला बुधवारी ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. तेव्हा तिनेच चोरी केल्याचे तिने कक्ष ११ च्या तपास अधिकाऱ्याकडे कबूल केले. त्यानुसार, तिच्या चौकशीत साकरिया या सोनाराचे नाव उघड झाले. त्याने रुचिताकडून चोरीचे सोने विकत घेत ते वितळविल्याचे तपासात उघड झाले.
रुचिता ही तक्रारदार महिला राहत असलेल्या इमारतीच्या शेजारच्या विंगमध्ये भाडे तत्त्वावर राहते. तिच्या पतीचे चारकोपमध्ये चष्म्याचे दुकान आहे. गोड बोलून लोकांशी मैत्री करायची आणि त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळायचे आणि ते परतही करायचे नाही.
एखादी व्यक्ती पैसे मागायला गेलीच, तर तिला काही न काही भावनिक कारण सांगत टोपी लावायची, अशी रुचिताची कार्यपद्धती होती. अंधेरी पोलीस ठाण्यातही तिच्याविरोधात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याचे वरिष्ठ अधिकाºयाकडून सांगण्यात आले.
योगाच्या बहाण्याने चोरी...
पीडित वृद्ध महिला ही पतीसोबत एकटीच राहत असल्याचे रुचिताला माहीत होते. या दोघी इमारतीत असलेल्या व्यायामशाळेत गेल्या होत्या. त्यावेळी वृद्धेची नजर चुकवून रुचिताने पर्समधील त्यांच्या घराची चावी चोरली आणि त्यांच्या घरी गेली. त्यानंतर, त्यांच्या कपाटातून दागिने घेऊन पुन्हा व्यायामशाळेत परतली आणि त्यांची चावी पर्समध्ये ठेऊन दिली. तिच्यावर कोणी संशय घेऊ नये, म्हणून तिने ही शक्कल लढविली. मात्र, अखेर ती पोलिसांच्या तावडीत सापडलीच.