नववधुचे कान कापून दागिने लंपास, चोरट्यांचा मध्यरात्री दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 05:03 PM2021-12-25T17:03:25+5:302021-12-25T17:04:26+5:30
चोरटे अंदाजे ३० ते ३५ वयोगटाचे असल्याचा अंदाज असून, त्यांनी अंगात जर्किन, हातात ग्लोव्ह्ज तसेच लोखंडी सळी, हातात स्टीलचे कडे, डोक्याला रुमाल बांधलेल्या अवस्थेत होते.
सोलापूर - जिल्ह्यातील मंगळवेढा शहर परिसरात असलेल्या एका बंगल्यात दरोडेखोरांनी मध्यरात्री 3.30 वाजता दरोडा टाकला. दरोडेखोरांनी गळ्याला चाकून लावून घरातील महिलांच्या अंगावरील दागिने रोख रक्कम असा 4.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी, नववधुसह महिलांच्या कानातील दागिने काढताना त्रास होऊ लागल्याने चक्क कात्रीने कानाल कट मारुन दागिने काढण्याचा निर्दयी प्रकार चोरट्यांनी केला. याप्रकरणी, अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रानुसार मंगळवेढा शहरालगतच्या धर्मगाव रोडवर फिर्यादी मंदाकिनी अंबादास सावंजी या त्यांच्या बंगल्यात राहतात. शुक्रवारच्या पहाटे साडेतीन वाजता अज्ञात सहा दरोडेखोरांनी कटावणीच्या सहाय्याने कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला. फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत अंगावरील सोने, घरातील पैसे काढून द्या अन्यथा तुम्हाला खल्लास करू, असे म्हणत नववधूच्या अंगावरील व फिर्यादीच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेतले. या झटापटीत फिर्यादीच्या अंगठ्याजवळच्या बोटाला जखम झाली.
चोरटे अंदाजे ३० ते ३५ वयोगटाचे असल्याचा अंदाज असून, त्यांनी अंगात जर्किन, हातात ग्लोव्ह्ज तसेच लोखंडी सळी, हातात स्टीलचे कडे, डोक्याला रुमाल बांधलेल्या अवस्थेत होते. चोरट्यानी महिलांच्या कानातील दागिने निघत नसल्याने दरोडेखोरांनी कात्रीच्या साह्याने कट मारून काढून घेतले.
या घटनेत सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व कपाटातील रोख रक्कम असा एकूण साडेचार लाखाचा ऐवज लुटून नेला. लग्नात आलेल्या साड्या व कपडे या वस्तूही घेऊन गेले. दरोडेखोरांनी जाताना कुटुंबीयांना एका खोलीत कोंडून बाहेरून कडी लावून गेले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी मदतीसाठी शेजाऱ्यांना मोबाईलवरून संपर्क साधत सुटका करून घेतली. या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधिकारी हिम्मतराव जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर श्वान पथक आले. ते श्वान घटनास्थळापासून पिकातून दामाजी कारखाना रस्त्यावरील सूत मिलपर्यंत गेले. याबाबत अज्ञात सहा चोरट्यांविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे करीत आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांच्या घराजवळच दरोडा
दरोडा पडलेल्या ठिकाणापासून पोलीस निरीक्षक गुंजवटे हे हाकेच्या अंतरावर राहतात. हा दरोडा ते राहत असलेल्या पाठीमागील बाजूस पडला तर, काही दिवसापूर्वी हजारे यांच्या बंगल्यावरील पडलेला दरोडा गुंजवटे राहत असलेल्या पुढील बाजूस पडला होता. दोन्ही दरोडे या पोलीस अधिकाऱ्यांच्या बंगल्याशेजारी घडल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती.
पोलीस ठाण्यासमोर महिलेचा आक्रोश
तपासासाठी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची एक नातेवाईक महिला पोलीस स्टेशन आवारात सर्व पोलीस अधिकाऱ्यांसमोर आमचे नातेवाईक दोषी नसताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचा आक्रोश केला. येथील जबाबदार स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून मरणार असल्याचा हंबरडा फोडून ओरडत होती. पोलिसांनी त्या महिलेचे अक्राळविक्राळ रूप पाहून पंढरपूरहून महिला पोलिसांचा बंदोबस्त मागविला.
चोऱ्यांचे सत्र सुरू
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात तीन दरोडे व अनेक छोट्या-मोठ्या चोऱ्यांचे सत्र गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. १५ दिवसापूर्वी पडोळकरवाडी येथे एका वृद्ध महिलेचा खून करून दागिने लुटले होते. त्या दरोड्याचा तपास अद्यापही लागला नाही. पुन्हा शहरात दरोडा पडल्याने दरोडेखोरांनी पोलिसांना आव्हान दिल्याने नागरिकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. याबाबत राज्याचे पोलीस महासंचालकांनी त्वरित लक्ष घालून सक्षम अधिकारी नेमून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.