निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांची जमीन हाडपण्याचा प्रयत्न, दोन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 07:55 PM2019-10-02T19:55:50+5:302019-10-03T11:04:48+5:30
आरोपींविरोधात जमीन व्यवहारासंबंधी विविध पोलीस ठाण्यात फसवणूकीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.
औरंगाबाद: बनावट कागदपत्राच्या आधारे निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांची कोट्यवधी रुपये किमतीची जमीन हाडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भूखंड माफियांना पुंडलिकनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. आरोपींविरोधात जमीन व्यवहारासंबंधी विविध पोलीस ठाण्यात फसवणूकीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.
सफदर अली मोहम्मद अब्दुला पेशमाम(रा. मोतीवालानगर) आणि मुकुंद गंगाधर कुलकर्णी (रा. गजानन कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, बीड येथील निवृत्त अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी धनराज वैजनाथ निला (रा.विशालनगर) आणि सुभाष ज्ञानोबा मोळवणे (रा. सिडको एन-४), सदाशिव लिंगराज हरिदास(रा.पानगाव ता. रेणापुर, जि. लातुर)यांनी २००८साली गारखेड्यातील गट नंब४८ मध्ये २० गुंठे जमीन खरेदी केली होती. या जमीनीचे सातबारा त्यांच्या नावे असून त्यांच्यात ताब्यात आहे. असे असताना आरोपींनी तक्रारदार यांच्या नावे बनावट व्यक्ती उभा करून आम मुख्यत्यारनामा(जीपीए )स्वत:च्या नावे तयार करून घेतला.
या जीपीएच्या आधारे या जमीनीतील भूखंड विक्रीचा नगरसेवक आत्माराम पवार च्या नातेवाईकांना विक्री केल्याचे दाखविले. एका खरेदीदाराने एक भूखंड खरेदी करण्याचा सौदा केला आणि याबाबत वकिलामार्फत वर्तमानपत्रात जाहिर प्रगटन दिले होते. हे प्रगटन वाचल्यानंतर तक्रारदार हे संंबंधित वकिलांना जावून भेटले तेव्हा फसवणूकीचा भंडाफोड झाला. आरोपींनी कट रचून बनावट कागदपत्राच्या आधारे आपली जमीन हाडपण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार निला यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. ही तक्रार दाखल झाल्यापासून आरोपी पसार झाले होते. दरम्यान सहायक आयुक्त रविंद्र साळेखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, कर्मचारी रमेश सांगळे, बाळाराम चौरे,शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे, राजेश यदमळ, दिपक जाधव आणि विशेष कार्य अधिकारी स्वप्नील विटेकर, शिवाजी बुट्टे यांच्या पथकाने आज बुधवारी आरोपी सफदर अली आणि मुकुंद कुलकर्णी यांना सेवनहिल परिसरात अटक केली.
नगरसेवक पवार यांचा शोध सुरू
याप्रकरणात शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार आरोपी असून पवार सध्या पसार आहे. पवार यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी दिली.