Latur Accident: लातूर- औसा महामार्गावर भीषण अपघात; पती, पत्नी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 06:48 PM2021-07-23T18:48:07+5:302021-07-23T18:48:54+5:30
Latur Accident: ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोटारसायकलची ट्रकला खडी केंद्राजवळ जोराची धडक बसली. औसा- लातूर राष्ट्रीय महामार्गावर असून सध्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.
औसा (जि. लातूर) : लातूर- औसा महामार्गावर शुक्रवारी दुपारी १ वा. च्या सुमारास दुचाकी- ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यात पती- पत्नी ठार झाले तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अपघातग्रस्त ट्रक व दुचाकीवरील तिघेजण औश्याकडे एकाच दिशेने जात होते. ओव्हरटेक करताना हा अपघात घडला. (Truck-bike accident at Ausa, Latur.)
राजू राठोड (४६) व शकुबाई राजू राठोड (४०, रा. वांजरखेडा तांडा, ता. भालकी, जि. बीदर) असे अपघातात ठार झालेल्या पती- पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, हरंगुळहुन वांजरखेडा (जि. बीदर) कडे दुचाकी (एमएच २४, एसी ८९०३) वरुन राजू राठोड, शकुबाई राठोड व मुलगी स्वाती राजू राठोड हे तिघेजण जात होते. लातूरहुन सोलापूरकडे ट्रक (टीएन ३४, एझेड २००८) हा जात होता. तेव्हा ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोटारसायकलची ट्रकला खडी केंद्राजवळ जोराची धडक बसली. त्यात दुचाकीवरील तिघेही ट्रकच्या चाकाखाली अडकले. या अपघातात शकुबाई यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या वडील व मुलीस लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता राजू राठोड यांचा मृत्यू झाला. मुलगी स्वाती (१७) ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळाला पोलीस उपनिरीक्षक शंकर पटवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी भेट देऊन पाहणी केली. अपघातग्रस्तांना तात्काळ लातूरला हलविले.
एकाच बाजूने वाहतूक...
औसा- लातूर राष्ट्रीय महामार्गावर असून सध्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे एक बाजूने रस्त्याचे काम सुरु असून दुस-या बाजूने वाहतूक होत आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत छोटे- छोटे अपघात घडत असल्याचे पहावयास मिळत आहे.
शरीरापासून तुटून एक पाय वेगळा...
हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील एकाचा एक पाय तुटून वेगळा पडला होता. तसेच घटनास्थळी रक्तमासांचा सडा पडला होता. ट्रकखाली अडकून पडलेल्यांना प्रत्यक्षदर्शी नागरिक आणि पोलिसांनी बाहेर काढले. दरम्यान, हा अपघात घडल्यानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.