Latur Crime News: लातूर हळहळले! पत्नीची गळा चिरुन हत्या; अवघ्या दोन वर्षांचे बाळ पदरात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 11:04 PM2022-02-08T23:04:58+5:302022-02-08T23:06:23+5:30
तीन वर्षांपासून विवाहितेचा सुरु हाेता छळ, घटनेचे वृत्त लातूर शहरात वाऱ्यासरखे पसरले आणि बघ्याची एकच गर्दी झाली.
लातूर : धारदार शस्त्राने गळा चिरुन पत्नीची हत्या केल्याची घटना लातूर शहरातील बार्शी मार्गालगत असलेल्या अवंती नगरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, पतीने नेमके काेणात्या कारणासाठी पत्नीची हत्या केली, हे कारण मात्र समजू शकले नाही. याचा पाेलीस शोध घेत आहेत. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील बार्शी मार्गावरील समांतर रस्त्यालगत असलेल्या अवंती नगरात एकाने आपल्या पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेचे वृत्त लातूर शहरात वाऱ्यासरखे पसरले आणि बघ्याची एकच गर्दी झाली. तीन वर्षापूर्वी लग्न झालेल्या एका विवाहितेला पती काही वर्षांपासून सतत छळत हाेता. याबाबत मुलीच्या आई-वडिलांनी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात अनेकदा धाव घेत न्याय मागितला. मात्र, त्याची साधी तक्रारही नाेंदवून घेण्यात आली नाही, असा आराेप मयत मुलीच्या वडिलांनी केला आहे. आमच्या तक्रारीची दखल घेवून पाेलिसांनी कारवाई केली असती, तर आज माझ्या मुलीचा जीव वाचला असता, असेही माध्यमांना वडिलांनी सांगितले.
काेराेनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मुलीच्या छळामध्ये वाढ झाली आणि आज त्याने अखेर तिची गळा चिरुन हत्या केली. गत तीन वर्षापासून आरोपी जावई सतत जीवे मारण्याची धमकी मुलीला आणि आम्हाला देत हाेता. याबाबत आपण वारंवार पाेलिसांकडे तक्रार केली मात्र त्यांनी याबाबत फारसे गांभीर्याने विचार केला नाही.
दोन वर्षाचे आहे अपत्य...
मयत विवाहितेचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला असून, तिला जवळपास दोन वर्षाचे बाळ आहे. तिचा २०२० पासून छळ सुरु असल्याचा आराेप मयताच्या कुटुंबियांनी केला आहे. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले हाेते. आराेपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयत मुलीच्या वडिलांनी घेतला हाेता.
महिनाभरात दुसरा खून...
एक महिन्यात लातूर शहरात दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या करण्यात आल्याची ही दुसरी घटना आहे. पहिली घटना विशालनगरात भररस्त्यावरच दुपारच्या सुमारास एका अल्पवयीन मित्राने काेयत्याने वार करत खून केला हाेता. तर आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पतीने पत्नीचा गळा चिरुन निर्घृण हत्या केली. या दाेन्ही घटना दिवसा घडल्या आहेत.