लातुरात कीर्ती कंपनीची एक काेटीला फसवणूक; गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Published: December 29, 2023 08:43 PM2023-12-29T20:43:30+5:302023-12-29T20:43:36+5:30
सूर्यफूल तेल पाठविताे म्हणून फसवणूक
लातूर : टॅरिफ रेड काेटा लायसन्सच्या आधारे एक हजार टन सूर्यफूल तेल पाठवीत असल्याचे सांगून, कन्फर्मेशन देऊनही ते तेल न पाठविता लातुरातील कीर्ती ॲग्राेवेट ग्राेवेट कंपनीला तब्बल ९८ लाख ८ हजार ४१ रुपयांना फसवल्याची घटना १२ जुलै ते १८ ऑगस्ट २०२२ या काळात घडली. या घटनेने उद्याेग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात चाैघांविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, व्यंकटेश उत्तमराव कुलकर्णी (वय ४५, रा. एसटी वर्कशाॅपसमाेर, ज्ञानेश्वरनगर, लातूर) यांनी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विटेरा प्रा. लि.चे संचालक मानेक गुप्ता याच्यासह अन्य तिघांनी संगनमत करून १२ जुलै २०२२ ते १८ ऑगस्ट २०२२ या काळात लातुरातील कीर्ती ॲग्राेवेट ग्राेवेट लिमिटेड कंपनीला भारत सरकार, व्यापार व उद्याेग मंत्रालयाकडून १२ जुलै राेजी टीआरक्यू (टॅरिफ रेट काेटा) लायसन्स प्राप्त झाले आहे. हे माहीत असताना व फिर्यादीने विटेरा प्रा. लि.कडे या टीआरक्यू लायसन्सच्या आधारे एक हजार टन सूर्यफूल तेलाची मागणी केली.
विटेरा प्रा. लि. आणि मेसर्स कार्गाे लिंग प्रा. लि. यांनी टीआरक्यूमधील माल पाठवीत असल्याचे १८ ऑगस्ट २०२२ रोजी ई-मेलद्वारे कन्फर्मेशन दिले. कन्फर्मेशन देऊनही या काेट्यातील माल अद्याप पाठविला नाही. यातून कीर्ती ॲग्राेवेट लि. लातूर या कंपनीची तब्बल ९८ लाख ८ हजार ४१ रुपयांनी फसवणूक केली. वारंवार पाठपुरावा करूनही एक हजार टन माल पाठवून दिला नाही. यातून कंपनीची फसवणूक झाल्याचे समाेर आले. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विटेरा प्रा. लि.चे संचालक मानेक गुप्ता याच्यासह इतर तिघांविराेधात गुरनं. ९५२/२०२३ कलम ४२०, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलिस पथक करत आहे.