गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या साथीदाराला अटक, गायक सिद्धू मूसवालाच्या मारेकऱ्यांना लपवण्यात केली होती मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 10:41 IST2024-02-04T10:40:07+5:302024-02-04T10:41:46+5:30
दोन्ही आरोपी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीसाठी काम करत होते.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या साथीदाराला अटक, गायक सिद्धू मूसवालाच्या मारेकऱ्यांना लपवण्यात केली होती मदत
पंजाब : पंजाब पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी मनदीप सिंग उर्फ छोटा मणी याला अटक करण्यात आली आहे. गायक सिद्धू मूसवालाच्या मारेकऱ्यांना लपण्याची व्यवस्था छोटा मणी याच्याकडून करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी मनदीप सिंग उर्फ छोटा मणी याच्यासह त्याचा साथीदार जतिंदर सिंग, तसेच मणिमाजरा येथील गोविंदपुरा परिसरातील एकाला अटक केली.
मनदीप सिंगच्या अटकेबद्दल पंजाब पोलिसांचे डीजीपी गौरव यादव म्हणाले की, पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी मनदीप सिंग उर्फ छोटा मणी आणि जतिंदर सिंग यांना अटक केली आहे. दोघांकडून 13 काडतुसेसह दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. ते म्हणाले, छोटा मणी जिरकपूर परिसरात असल्याची माहिती मिळाली. यानंतर पंजाब पोलिसांच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्सच्या पथकांनी माहितीच्या आधारे कारवाई करत त्याला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. दोन्ही आरोपी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीसाठी काम करत होते.
या दोघांविरुद्ध चंदीगड आणि हरयाणामध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. छोटा मणीने मूसवालाच्या मारेकऱ्यांसाठी लपण्याची व्यवस्था केली होती, त्यानंतर त्याने मे 2022 मध्ये गायकाची गोळ्या झाडून हत्या केली होती. डीजीपी म्हणाले की, आरोपींना परदेशातील त्यांच्या हँडलरद्वारे प्रतिस्पर्धी गुंडांच्या हत्येचे काम सोपवण्यात आले होते, असे प्राथमिक तपासात असे दिसून आले.
तसेच, सहाय्यक महानिरीक्षक संदीप गोयल म्हणाले की, बिश्नोईला छोटा मणीला परदेशात स्थायिक होण्यास मदत करायची होती आणि युरोपमध्ये सुरक्षित प्रवेशासाठी त्याला तीन वेळा दुबईला पाठवले होते. मात्र, छोटा मणी युरोपमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरला. यानंतर त्याला पुन्हा भारतात परतावे लागले.