"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 02:58 PM2024-11-29T14:58:50+5:302024-11-29T14:59:41+5:30
Lawrence Bishnoi And Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सिद्दिकी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या एका आरोपीने मोठा दावा केला आहे.
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सिद्दिकी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या एका आरोपीने मोठा दावा केला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचला जात असताना गुजरात जेलमध्ये असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी बोलणं झालं होतं असा दावा त्याने केला आहे. मुख्य शूटर शिवकुमार गौतम याने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली.
हत्येचा प्लॅन करताना लॉरेन्स बिश्नोईशी बोलल्याचं गौतमने अधिकाऱ्यांना सांगितलं. लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील जेलमध्ये बंद आहे. शूटरने सांगितलं की, यावेळी लॉरेन्स बिश्नोईने शूटरला आश्वासन दिलं होतं, हत्येनंतर पोलिसांना घाबरण्याची गरज नाही.
लॉरेन्स बिश्नोईने गौतमला सांगितलं होतं की, पकडले गेलात तरी घाबरू नका, काही दिवसांतच त्यांना तुरुंगातून बाहेर काढलं जाईल. शूटर गौतमने पुढे सांगितलं की, बिश्नोईने त्याला हत्येसाठी १२ लाख रुपये देण्याचं वचन दिलं होतं.
जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याला परदेशात पाठवण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं. गौतम म्हणाला, लॉरेन्स बिश्नोईने त्याला सांगितलं की त्याच्याकडे वकिलांची एक टीम आहे, जी त्याला अटक केल्यानंतर काही दिवसांत सोडवू शकते.
लॉरेन्स बिश्नोईचं नाव बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात समोर आलं आहे. यापूर्वी या प्रकरणात बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचे नावही समोर आलं होतं. हत्येच्या कटात सहभाग असल्याच्या कारणावरून अनमोलचं नाव तपासात पुढे आलं होतं, मात्र आता या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचं नाव जोडलं गेल्याने पोलिसांच्या तपासाला नवं वळण मिळालं आहे.
१२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकी यांची मुंबईतील वांद्रे येथे मुलगा झिशान यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. बाबा सिद्दिकी यांचे अभिनेता सलमान खानशी जवळचे संबंध असल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचं या गँगने म्हटलं आहे.