सुनेसोबत सासऱ्याचे अनैतिक संबंध; अडसर ठरणाऱ्या मुलाची बापाकडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 04:08 PM2019-02-14T16:08:04+5:302019-02-14T16:09:33+5:30
आरोपीचे सुनेसोबत अनैतिक संबंध होते आणि यात मुलाचा अडथळा येत असल्याकारणाने त्याने मुलाचा काटा काढल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे.
फरिदकोट - पंजाबमधील फरिदकोट येथे ६२ वर्षांच्या वृद्धाने सुनेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून आपल्या ४० वर्षीय मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. आरोपीचे सुनेसोबत अनैतिक संबंध होते आणि यात मुलाचा अडथळा येत असल्याकारणाने त्याने मुलाचा काटा काढल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. छोटा सिंहने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. हत्येनंतर त्याने मुलाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते तुकडे एका मोठ्या पिशवीत भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
फरिदकोट जिल्ह्यातील डाबरी खाना या गावात छोटा सिंह (६२) हा त्याच्या मुलांसह राहतो. छोटा सिंहचा मोठा मुलगा ४० वर्षांचा होता. त्याचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या दाम्पत्याला मुले देखील आहेत. छोटा सिंहचे मोठ्या सुनेसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. यात मोठा मुलगा अडथळा ठरत असल्याकारणाने छोटा सिंहने दोन महिन्यांपूर्वी सुनेसाठी फरिदकोट शहर येथे भाड्याने घरही घेतले आणि सुनेशी लग्न करुन या घरात राहायला जाण्याचा निर्णय देखील त्याने घेतला होता. सासरा व सुनेमधील संबंधाची छोटू सिंहच्या पत्नीला याची माहिती होती. मात्र, छोटा सिंह कोणाचेही ऐकत नव्हता. काल रात्री छोटा सिंहचा मोठा मुलगा घरात झोपला होता. यादरम्यान छोटा सिंहने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. हत्येनंतर त्याने मुलाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते तुकडे एका मोठ्या पिशवीत भरले. छोटा सिंह ही पिशवी घराबाहेर फेकायला जात असताना लहान मुलाने त्याला पाहिले. पिशवीवर रक्ताचे डाग असल्याने त्याने वडिलांना याबाबत विचारले असता छोटा सिंहने मोठ्या मुलाची हत्या केल्याचे उघड झाले. कुटुंबियांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत छोटा सिंहला जेरबंद केले आहे.