ॲट्रॉसिटीप्रकरणी वकिलाला ६ महिने कारावास; ठाणे सत्र न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 06:06 AM2022-10-14T06:06:53+5:302022-10-14T06:06:59+5:30
वाडा येथे २०१५ मध्ये हा प्रकार घडला होता. तक्रारदार रामचंद्र जाधव आणि आरोपी भोईर हे दोघे परिचयाचे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून तक्रारदाराला जातीवाचक शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. भागवत यांनी वकील प्रमोद भोईर यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (ॲट्रॉसिटी) कायद्यान्वये सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सहा साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरल्याची माहिती सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी गुरुवारी दिली.
वाडा येथे २०१५ मध्ये हा प्रकार घडला होता. तक्रारदार रामचंद्र जाधव आणि आरोपी भोईर हे दोघे परिचयाचे आहेत. भोईर यांनी जाधव यांना ११ जुलै २०१५ रोजी फोन करून एक लाखाची मदत करा, अशी विनंती केली होती. त्यांनी इतरांकडून पैसे गोळा करून त्यांना एका महिलेमार्फत दिले. मात्र ठरल्यानुसार पैसे परत मागण्यासाठी जाधव यांनी भोईर यांना संपर्क केला असता त्यांचा फोन घेतला नाही.
त्यानंतर पुन्हा २९ जुलैला मित्राच्या मोबाइलवरून जाधव यांनी फोन करून भोईर यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी पैशांची मागणी केल्याच्या रागातून भोईर यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल
झाला होता.
६ साक्षीदार तपासले
सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी या खटल्यात सादर केलेले पुरावे आणि सहा साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरोपीला ॲट्रॉसिटी कायद्यान्वये दोषी सहा महिने कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने बुधवारी सुनावली.