१२ वाहने चोरणाऱ्यांच्या अलिबागमध्ये LCBने आवळल्या मुसक्या
By निखिल म्हात्रे | Published: November 28, 2022 07:08 PM2022-11-28T19:08:25+5:302022-11-28T19:09:03+5:30
तीन आरोपींविरोधात १२ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: जिल्ह्यातील ११ मोठी वाहन तर एक पल्सर मोटार सायकल अशी ३० लाख १२ हजार रुपये किंमत असलेल्या वाहनांची चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केली आहे. यातील तीन आरोपींविरोधात १२ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते.
मारूती तेऊरवाडकर, अक्षक पवार, करीम शरीफ मोहीद्दीन शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की १७ ऑक्टोबर 2022 रोजी फिर्यादी जेवताना येथील मुंबई गोवा हायवे रोड लगत असलेल्या एच.पी. पेट्रोल पंपाचे समोरील रोडवरून एक 1110 मॉडेलचा आयशर टेम्पो चोरीस गेला असल्याची फिर्याद महाड एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्यात भा.द.वि.सं.कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभिर्य ओळखून वाहन चोरांना चाप बसावा यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कसून तपास करण्यास सुरुवात केली होती.
अलिकडील काळात रायगड जिल्ह्यामध्ये तसेच आजूबाजूचे जिल्ह्यांमध्ये चारचाकी वाहन चोरीचे अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहीती समोर आली होती. सदर घटनेची गांभिर्य़ाने दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तात्काळ आरोपीत यांचा शोध घेवून सदरचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा राचन अलिबाग यांना आदेश दिले होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील तिन वेगवेगळी तपास पथके तात्काळ तयार करून नमुद स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या घटनेचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलिस हवालदार अमोल हंबीर यांना गोपनीय बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील आरोपी कोल्हापूर, सातारा तसेच कर्नाटक येथील असल्याची माहीती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश कदम, पोसई विकास चव्हाण व त्यांचे तपास पथकाने अमोल हंबीर यांना मिळालेल्या माहितीवरून 3 आरोपींना ताब्यात घेवून त्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.