धक्कादायक! १० रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरून छापल्या ५०० च्या नकली नोटा; यूट्यूबवर शिकले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 10:47 AM2024-11-09T10:47:08+5:302024-11-09T10:48:26+5:30
पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे १० हजार रुपयांच्या ५००-५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही लोक यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बनावट नोटा कशा छापायचे हे शिकत होते. खऱ्या नोटांसारख्या या नोटा दिसण्यासाठी दहा रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरत होते. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे १० हजार रुपयांच्या ५००-५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. नोटा छापण्यासाठी वापरलेले प्रिंटर, लॅपटॉप आणि इतर उपकरणंही जप्त करण्यात आली आहेत.
रामगड मार्केट परिसरात काही लोक बनावट नोटांचा व्यवसाय करत असल्याची माहिती एका खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळी असलेल्या दोघांना अटक केली.प्रमोद मिश्रा आणि सतीश राय अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी यूट्यूबवरून बनावट नोटा बनवण्याचे शिकून घेतल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे.
आरोपींनी आतापर्यंत सुमारे ३० हजार रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खर्च केल्याचा दावा आहे. अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बनावट नोटा खऱ्या नोटांसारख्या दिसण्यासाठी दहा रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरायचे. स्टॅम्प पेपरवर नोटांची छपाई करून, बनावट नोटा अधिक खऱ्या नोटांसारख्या दिसू लागल्या, जेणेकरून लोकांना संशय येऊ नये.
आरोपींनी सेम टू सेम नोटा तयार करण्यासाठी प्रिंटींग टेक्नॉलॉजीचा वापर केला. सोनभद्रचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) कालू सिंह यांनी सांगितलं की, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात या गँगचे आणखी काही सदस्य आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत.