'परतावा सोडा मुद्दलही गेले'; बंगळुरूच्या कंपनीचा औरंगाबादेतील ८ गुंतवणूकदारांना ४० लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:05 PM2019-12-14T18:05:55+5:302019-12-14T18:09:28+5:30
या कंपनीने विविध ठिकाणाच्या २०० ते ३०० गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
औरंगाबाद : व्यवसायात पैसे गुंतवा, होणाऱ्या नफ्याची रक्कम हमखास दरमहा खात्यात जमा होईल, असे आमिष दाखवून कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू येथील एका खाजगी कंपनीने शहरातील ८ जणांची ४० लाखाची फसवणूक केल्याचे समोर आले. याविषयी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कंपनीने विविध ठिकाणाच्या २०० ते ३०० गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
मोहम्मद अयुब हुसेन, मोहम्मद अनिस अयमान (रा. बंगळुरू)अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी आर्थिक गुन्हेशाखेने सांगितले की, आरोपींच्या रिदास इंडिया कंपनीचे जुनाबाजार येथे कार्यालय होते. हे कार्यालय जानेवारीपासून बंद आहे. आरोपी हे कंपनीचे संचालक आहेत. शहरातील गुंतवणूकदारांना भेटून त्यांच्या कंपनीत पैसे गुंतविण्याचे आवाहन करीत. गुंतवणूकदारांची रक्कम आरोपी त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करायचे. या व्यवसायात मिळणारा नफा ते गुंतवणूकदारांना दरमहा त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल असे सांगत होते. विशेष म्हणजे ही दरमहा तुमच्या खात्यात हमखास रक्कम जमा होईल, अशी ग्वाही आरोपी देत. त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या काही लोकांना त्यांनी सुरवातीला परतावे दिले. यामुळे औरंगाबाद शहर आणि अन्य ठिकाणच्या शेकडो लोकांनी आरोपींच्या कंपनीत पैसे गुंतविले.
तक्रारदार मोहम्मद रफी मोहम्मद ताहेर शेख (३७,रा. सादातनगर परिसर)हे खाजगी व्यवसाय करतात. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने आरोपींच्या कंपनीत आरटीजीएसद्वारे १६ लाख ५० हजार रुपये गुंतविले. कंपनीने नियमाप्रमाणे तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीला परतावा दिला नाही. एवढेच नव्हे तर मुद्दलही परत केली नाही. त्यांच्याप्रमाणेच अन्य एका महिलेने २लाख ५० हजार रूपये, परवेज रहिम खान पठाण २ लाख रुपये, सय्यद खमर सय्यद फैयाज यांननी २ लाख, शेख अझरूद्दीन शेख शरफोद्दीन यांनी २ लाख, शेख अझरूद्दीन शेख अजीजोद्दीन ७ लाख रुपये, शेख मोहसीनोद्दीन दिड लाख, अब्दुल आवेज रऊफ शेख साडेसहा लाख रुपये असे सुमारे ४० लाख रुपयांची फसवणूक केली.