दुर्दैवी! २ वर्षीय चिमुकलीला कारमध्येच विसरून महिला निघून गेली; ७ तासानंतर जेव्हा परतली तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 05:48 PM2021-07-19T17:48:49+5:302021-07-19T17:51:05+5:30
फ्लोरिडाच्या ४३ वर्षीय जुआना पेरेज डोमिंगो हिला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.
कारमध्ये अनेकदा काहीजण आपलं सामान विसरतात परंतु अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणारी एक महिला चक्क तिच्या २ वर्षाच्या चिमुकलीला कारमध्ये विसरून निघून गेली. या मुलीला सीटबेल्ट घातला होता. महिलेने कार रस्त्यात उभी करून घरात निघून गेली. ७ तासानंतर जेव्हा ती परतली तेव्हा तिला मोठा धक्काच बसला. कारमध्ये असलेल्या चिमुकलीचा दुर्देवी अंत झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेला अटक केली.
फ्लोरिडाच्या ४३ वर्षीय जुआना पेरेज डोमिंगो हिला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. ७ तास २ वर्षीय मुलीला कारमध्ये सीटबेल्ट घालून बंद करण्यात आलं. त्यामुळे या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेवर आहे. एनबीसी मियामी रिपोर्टनुसार, २ वर्षीय मुलगी जिचं नाव जोसलीन मारित्जा मेन्डेज आहे. आरोपी महिलेवर मुलांना डेकेअरला घेऊन जाण्याची जबाबदारी आहे.
शुक्रवारी आरोपी महिला २ वर्षीय चिमुकली जोसलीनला घरातून डेकेअरकडे घेऊन जाण्यासाठी व्हॅनने निघाली. परंतु ६.३० वाजता डेकेअर सेंटर उघडलं नव्हतं म्हणून महिलेने त्या चिमुकलीला स्वत:च्या घरी नेलं. सकाळी ८ वाजता आरोपी महिलेने पेरेज डोमिंगो नावाच्या छोट्या मुलीला तिच्या टोयोटा मिनी व्हॅनच्या तिसऱ्या रांगेतील सीटवर बसवलं आणि तिला सीटबेल्ट बांधला. या चिमुकलीला व्हॅनमध्ये विसरून आरोपी महिला तिच्या घरी निघून गेली. ३० डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्याने कारमध्ये बसलेल्या मुलीचा तब्येत बिघडली. पेरेज डोमिंगो सात तासानंतर दुपारी ३ च्या सुमारास व्हॅनमध्ये परतली तोपर्यंत चिमुकलीचा मृत्यू झाला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, या महिलेने आपत्कालीन सुविधेसाठी फोन करण्याऐवजी तिच्या मुलीला फोन केला आणि तिच्या मृत्यूची बातमी दिली. त्यानंतर आरोपी महिला मुलीचा मृतदेह घेऊन तिच्या घरी पोहचली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांनी मिळाली असता चिमुरडीचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. त्यानंतर आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली. पेरेज डोमिंगो हिच्यावर ५० हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे.