'भाव' खाणाऱ्या लिंबांवर चोरांचा डल्ला; ६० किलोंचा माल घेऊन चोरटे पसार झाले, अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 12:51 PM2022-04-11T12:51:06+5:302022-04-11T12:52:53+5:30
लिंबांसह कांदे आणि लसूणही चोरीला; चोरट्यांनी वजन काटादेखील पळवला
शाहजहापूर: सध्या लिंबाचे दर आभाळाला भिडले आहेत. दरवेळी उन्हाळ्यात आंब्यांच्या दराची चर्चा होते. मात्र यंदा लिंबं भाव खाऊन जात आहेत. लिंबाचे दर किलोमागे अडीचशे ते तीनशेपर्यंत पोहोचले आहेत. लिंबाचे दर इतके वाढले आहेत की आता त्याची चोरी होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशच्या शाहजहापुरातील तिलहरमध्ये लिंबू चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
भाजी विक्रेते मनोज कश्यप यांच्या गोदामातून ६० किलो लिंबू चोरीला गेले. त्यासोबतच १० किलो लसूण, ४० किलो कांदेही चोरट्यांनी पळवले. कश्यप यांनी अद्याप तरी या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केलेली नाही. कश्यप यांनी तक्रार नोंदवल्यास कारवाई करू, असं पोलिसांनी सांगितलं.
शनिवारी रात्री मनोज कश्यप यांच्या गोदामात चोरी झाली. कश्यप यांनी शनिवारी संध्याकाळीच लिंबू खरेदी केले होते. २०० रुपये किलो दरानं त्यांनी लिंबांची खरेदी केली होती. त्याच्या गोणी गोदामात ठेऊन कश्यप यांनी कुलूप लावलं. गोदामात चोरी झाल्याची माहिती सकाळी त्यांना समजली. चोरटे लिंबू, लसूण, कांद्यासोबतच वजन करायचा काटा घेऊन पसार झाले.