बिबट्या ठरला अंधश्रद्धेचा बळी, आरोपींची संख्या पोहोचली अकरावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 09:17 PM2019-12-14T21:17:14+5:302019-12-14T21:20:30+5:30
बिबट्याची शिकार अघोरी शक्ती प्राप्त करण्यासाठी करण्यात आल्याचे वनविभागाच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
वर्धा - मांडवा शिवारात गुरूवारी दोन ते अडीच वर्षीय बिबट्याचा मृतदेह पाय व मुंडके नसलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या बिबट्याची शिकार अघोरी शक्ती प्राप्त करण्यासाठी करण्यात आल्याचे वनविभागाच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. अटक केलेल्या आरोपींकडून मृत बिबट्याचे तीन पाय आणि मुंडके जप्त करण्यात आले आहे. परंतु, बिबट्याचा चौथा पाय अद्यापही वनविभागाच्या अधिका-यांना मिळालेला नाही. शुक्रवारी सात आरोपींना अटक करून त्यांची १५ डिसेंबरपर्यंत वनकोठडी वनविभागाच्या अधिकाºयांनी मिळविली आहे. तर शनिवारी आणखी चार आरोपींना वनविभागाच्या अधिका-यांनी अटक केल्याने सध्या आरोपींची संख्या अकरावर पोहोचली आहे.
वनविभागाच्या अधिका-यांनी शनिवारी अटकेत असलेल्या आरोपींना सोबत घेऊन घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. इतकेच नव्हे तर आरोपींनी गुन्हा कशा पद्धतीने केला याची माहितीही जाणून घेतली. शुक्रवारी वनविभागाच्या अधिका-यांनी गोविंद केकापूरे, प्रवीण बुरघाटे, मंगल मानकर, महेश आमझरे, राहूल कासार, रमेश कासार, नरेंद्र कासार या आरोपींना अटक करून त्यांची १५ डिसेंबरपर्यंत वनकोठडी मिळविली आहे. तर शनिवारी अशोक चाफले, आनंदा चाफले, आनंदा रावेकर तर राजू कुभेंबार यांना अटक करण्यात आली आहे. गुरूवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने अघोरी शक्तीच्या प्राप्तीसाठी संगणमत करून बिबट्याची शिकार केली, शिवाय पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने बिबट्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न केल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
शनिवारी अटकेतील आरोपींना सोबत घेत वनविभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रसंगी सहाय्यक उपवनसंरक्षक तुषार डमढेरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, क्षेत्र सहाय्यक उमेश शिरपुरकर, श्याम परडके, रवी राऊत, जाकीर शेख, विनोद सोनवणे आदींची उपस्थिती होती.