शिकाऱ्यांच्या फासकीत अडकला बिबट्या; पायाचा पंजा तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 08:39 PM2022-02-08T20:39:00+5:302022-02-08T20:39:09+5:30
खोडशीतील घटना : वन विभागाने केली सुटका; पायाचा पंजा तुटल्याने बिबट्या जखमी
कऱ्हाड : नदीकाठावरील शिवारात शिकाऱ्यांनी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकला. खोडशी, ता. कऱ्हाड येथे मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फासकीतून निसटण्याच्या प्रयत्नात बिबट्याच्या पंजाला जखम झाली असून वन विभागाने त्याला ताब्यात घेत औषधोपचार सुरू केले आहेत.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, खोडशी येथे कृष्णा नदीकाठी सावकार वस्ती नावाचे शिवार असून या शिवारात मोठ्या प्रमाणावर ऊसाचे क्षेत्र आहे. या शिवारात सोमवारी रात्री अज्ञात शिकाऱ्यांनी शिकारीसाठी फासकी लावली होती. या फासकीवर पाय पडल्यामुळे बिबट्याचा पंजा त्यामध्ये अडकला. फासकीतून सुटका करुन घेण्यासाठी त्याने धडपड केली. त्यामध्ये त्याचा पंजाही पुर्णपणे तुटला.
दरम्यान, मंगळवारी सकाळी काही शेतकरी शेतामध्ये निघालेले असताना त्यांना फासकीत अडकलेला बिबट्या दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. तसेच पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वायजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह वनपाल बाबूराव कदम, वनरक्षक रमेश जाधवर त्याठिकाणी पोहोचले. याचवेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे पोलीस फौजफाटाही त्याठिकाणी मागविण्यात आला. पोलीस पोहोचल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना हटवले. यावेळी ग्रामस्थांची पोलिसांशी शाब्दिक चकमकही उडाली. ग्रामस्थांची गर्दी कमी झाल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फासकीत अडकलेल्या बिबट्याला जाळी टाकून पकडले. तसेच पिंजऱ्यात घालून सुरक्षितस्थळी हलविले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सवणे यांनी भुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्याच्या पायावर उपचार सुरू केले आहेत.
मध्यप्रदेशचा ‘बहेली ट्रॅप’ खोडशीत!
बिबट्या ज्या फासकीत अडकला त्या फासकीला बहेली ट्रॅप असे म्हणतात. मध्यप्रदेश येथील ही शिकाऱ्यांची टोळी देशभरात वाघाच्या शिकारीसाठी कुप्रसिद्ध आहे. त्यांची शिकार करण्याची पद्धत वेगळी असून ते जी फासकी वापरतात तीच फासकी खोडशीत बिबट्याच्या पायामध्ये आढळून आली आहे. त्यामुळे वन विभागाने कसून तपास सुरू केला आहे.