आरोपींनी इंटरनेटवरून घेतले बॉम्ब बनविण्याचे धडे, सनातनचे संस्थापक चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता
By पूनम अपराज | Published: August 21, 2018 11:44 PM2018-08-21T23:44:32+5:302018-08-21T23:46:55+5:30
वैभव राऊतसह इतर आरोपींनी इंटरनेटवरून बॉम्ब कसे बनवतात याचे धडे गिरवले तर पांगरकरने देशभर फिरून केली होती रेकी
मुंबई - नालासोपारा येथे सापडलेल्या शस्त्रे आणि स्फोटकांप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव राऊत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी इंटरनेटवरून बॉम्ब बनविण्याचे धडे घेतल्याचे एटीएसच्या चौकशीतून समोर आले आहे. वैभव आणि त्याचे सहकारी विशेषत: श्रीकांत पांगारकरने देशभरात फिरून अनेक महत्वाच्या स्थळांची पाहणी केली होती. मात्र, त्याने नेमकी कोणती आणि ही स्थळे का हेरली होती याबाबत एटीएस तपास करीत आहेत. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता एटीएसच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. तसेच वैभव राऊत आणि त्याचे काही सहकाऱ्यांचा सनातन संस्थेशी काही वर्ष संबंध होता. ते अनेकदा गोवा येथे जाऊन संस्थेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. त्यामुळे या प्रकरणात गरज पडली तर सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांची देखील चौकशी केली जाईल असे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
हिंदुत्ववादी संघटनांचे काही कार्यकर्ते घातपात घडविण्याचा कट करीत असल्याची माहीती मिळाल्यानंतर एटीएसने नालासोपारा येथे राहणाऱ्या वैभव राऊत याच्या निवासस्थानी आणि दुकानाच्या गाळ्यात छापे टाकले. वीस गावठी बाॅम्बसह स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर वैभवच्या संपर्कात असलेल्या शरद कळसकरला नालासोपाऱ्यातून आणि सुधन्वा गोंधळेकरला पुणे येथून तर श्रीकांत पांगारकर याला जालना येथून अटक करण्यात आली. या तिघांकडेही एटीएसला शस्त्रे, बाॅम्ब बनविण्याचे साहित्य, तसेच पुस्तके सापडली. हे चौघेही २८ ऑगस्टपर्यंत एटीएसच्या कोठडीत असून त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या सर्वांकडे सापडलेल्या पुस्तकांमध्ये स्फोटकांची माहिती होती तर त्यांनी कागदावर रेखाटलेली सर्किटही सापडली. बॉम्ब कसे बनवायचे हे इंटरनेटवरून हे सर्व शिकत होते. ठाणे येथील गडकरी रंगायतन, पनवेल आणि गोवा येथे स्फोट घडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हे तीनही प्रयत्न अयशस्वी झाले होते. असे पुन्हा होऊ नये म्हणून वैभव राऊत आणि त्याच्या साथीदारांनी बॉम्ब बनविण्याचे धडे इंटरनेटवरून गिरवल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.
एटीएसने अटक केलेल्या चौघांपैकी शरद कळसकर याचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात थेट सहभाग असल्याचे उघड झाले आहे. शरदच्या चौकशीतून सचिन अंदुरे याचं नाव पुढे आलं. या दोघांचा दाभोलकर यांच्या हत्येमध्ये हात असून इतरांचा अद्याप सहभाग आढळून आला नसल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र, वैभव राऊत आणि त्याच्या मित्रांनी शस्त्रे आणि स्फोटकांचा इतका साठा कशासाठी केला होता हे अद्याप कळू शकले नाही. हे वेगवेगळ्या ग्रुपमधून कार्यरत असून एकाचे दुसऱ्याला फारसे काही माहित नाही. त्यामुळे त्यांच्यामागे कोणीतरी मास्टरमाइंड असल्याची शक्यता आहे. याबाबत काही प्राथमिक माहिती हाती लागली असून त्याची शहानिशा करण्याचे काम सुरु असल्याचेही एटीएसच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. इंटरनेटवरून बॉम्ब बनविण्याचे धडे, एकमेकांशी बोलताना सांकेतिक शब्दांचा वापर यामुळे या सर्वांना अशा कारवायांसाठी चांगले प्रशिक्षण देण्यात आल्याचे देखील स्पष्ट होत आहे.