लिव्ह इन रिलेशनशिपमधून अभियंत्याच्या मुलीने संपविले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 06:56 AM2019-06-26T06:56:56+5:302019-06-26T06:57:11+5:30
लिव्ह इन रिलेशनशिपमधून अभियंत्याच्या मुलीने आयुष्य संपविल्याचे रविवारी बोरीवलीत उघडकीस आले. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी निशांक शर्माविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : लिव्ह इन रिलेशनशिपमधून अभियंत्याच्या मुलीने आयुष्य संपविल्याचे रविवारी बोरीवलीत उघडकीस आले. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी निशांक शर्माविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गोराईत ५५ वर्षीय तक्रारदार हे पत्नी आणि दोन मुलींसोबत राहतात. १० नोव्हेंबर, २०१३ रोजी मुलगी नेहा (नावात बदल) हिने आंतरजातीय प्रेमविवाह केला. मात्र, त्यांच्यात न पटल्याने २०१५ मध्ये घटस्फोट घेण्याचे ठरविले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. नेहाही माहेरी राहण्यास आली.
तेथे तिने फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला. दरम्यान तिची निशांक शर्मासोबत ओळख झाली. तो मीरा रोड येथे राहतो. तो तिला आॅर्डर मिळवून देत होता. सर्व सुरळीत सुरू असताना, १५ जूनला ३१ वर्षीय नेहाने घरातील बेडरूममध्ये गळफास घेतला. बोरीवली पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला.
त्यानंतर, काही दिवसांनी लहान मुलीने नेहाबाबत वडिलांना माहिती दिली. निशांक आणि नेहा गेल्या एक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. नेहाचा घटस्फोट झाल्यानंतर दोघेही लग्न करणार होते. रविवारी त्यांनी नेहाचा मोबाइल क्रमांक तपासला, तेव्हा आत्महत्येच्या आदल्या दिवशीच शशांकने नेहाच्या चारित्र्यावर संशय घेत, तिला अश्लील शिव्यांचे संदेश पाठविल्याचे निदर्शनास आले. त्याच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून नेहाने टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट होताच, वडिलांनी बोरीवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून बोरीवली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा देत, अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण डुंबरे यांनी दिली.