संपत्तीच्या हव्यासाने घेतला जीव, वृद्ध दाम्पत्याच्या क्रूर हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 11:31 PM2020-01-20T23:31:53+5:302020-01-20T23:34:07+5:30

९ डिसेंबर २०१४ रोजी वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील चिकूच्या वाडीतील बंगल्यात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची झाली होती क्रूर हत्या

life-imprisonment to accused for murder of elderly couple | संपत्तीच्या हव्यासाने घेतला जीव, वृद्ध दाम्पत्याच्या क्रूर हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप

संपत्तीच्या हव्यासाने घेतला जीव, वृद्ध दाम्पत्याच्या क्रूर हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप

Next

- मंगेश कराळे
नालासोपारा - ९ डिसेंबर २०१४ रोजी वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील चिकूच्या वाडीतील बंगल्यात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची क्रूरपणे हत्या केली. त्यासोबतच घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही चोरून नेले. या ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येमुळे वाणगाव आणि आसपासच्या परिसरातील गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वाणगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. बोईसरचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि आताचे वसई अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्याकडे तपासाची सूत्रे दिली होती. या हत्येचा उलगडा करून आरोपींना पकडण्यासाठी ५ पथकांची स्थापना करण्यात आली.

डहाणू तालुक्यातील वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कोटीम गावात नौसिर अरदेशर ईराणी (७६) आणि त्यांची पत्नी नर्गीस नौसिर ईराणी (७४) हे दाम्पत्य अंदाजे ३ ते ४ एकरच्या चिकूच्या वाडीतील बंगल्यात रहात होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी मुंबईत तर डॉक्टर मुलगा अमेरिकेत राहतो. एके दिवशी पैशांसाठी या दाम्पत्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली. नौसिर यांच्या डोक्यात लाकडाच्या दांडक्याचा जोरदार फटका मारत स्वयंपाकघरात त्यांची हत्या केली. तर नर्गीस यांची बंगल्याच्या बाहेरील बागेत गळ्यावर वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्येची माहिती वाणगाव पोलिसांना मिळाल्यावर प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक फेगडे हे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याने चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी धरून १० डिसेंबर २०१४ ला गुन्हा दाखल केला होता.

घरी कोण - कोण येते - जाते, याची माहिती आसपासच्या लोकांकडून घेण्याचा प्रयत्न केला तर तेथेही काही माहिती मिळाली नाही. या दाम्पत्याकडे त्यांच्या मुलाने संपर्कासाठी दिलेला मोबाइलही चोरी झाल्याचे मुलीने सांगितले. या मोबाइलचा शोध घेतला आणि त्यानेच शेवटी आरोपींपर्यंत पोहोचवले. पोलिसांनी मोबाइल नंबरचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी टाकले होते. चोरट्यांनी त्यांच्याजवळील सीम कार्ड त्यात टाकले आणि त्याचे लोकेशन गुजरात राज्यातील सूरत इथे असल्याचे कळल्यावर पोलिसांनी तेथे जाऊन आरोपींना त्या मोबाइलसह पकडून आणले. पहिले ३ दिवस त्याने चौकशीत सहकार्य केले नाही. पण चौथ्या दिवशी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पैशांसाठी या दाम्पत्याचा खून केल्याचे कबूल केले.

आरोपी मोहम्मद रफिक आदम शेख उर्फ रबेन उर्फ रवी रामखिलावसिंग ठाकूर (३१) हा इराणी दाम्पत्याच्या घरी १० वर्षांपूर्वी कामाला होता. त्यांच्याकडे काम करणाºया कामगाराचा हा मुलगा. तेव्हा आरोपी शाळेत होता. पण, लहानपणापासून घरात छोट्यामोठ्या चोºया करण्याची त्याला सवय होती. त्याला वडिलांनी अनेकदा सज्जड दम देत मारही दिला. पण, एके दिवशी रवी घरात चोरी करत असताना त्याच्या वडिलांनी रंगेहाथ पकडले आणि चांगलाच चोप दिला. त्यानंतर तो गुजरातला पळून गेला. तेव्हापासून तो कोणाच्याही संपर्कात नव्हता. तो सूरत येथील एका मुस्लिम परिवारासोबत रहात होता. आणि लहानमोठी कामे करत होता. त्याने त्याच घरातील मुलीशी लग्न केले आणि धर्मांतरही. नंतर कुटुंब वाढल्याने त्याची पैशांची गरज वाढली. कालांतराने तो कर्जबाजारी झाला. पैशांची चणचण तसेच पैसे कुठून मिळतील, या विचाराने त्याने चोरीचा प्लॅन आखला.



चोरी करण्याच्या उद्देशाने तो वाणगाव येथील या वृद्ध दाम्पत्याच्या वाडीत आला होता. घरी न जाता तो या चिकूच्या वाडीत ३ दिवस आणि ४ रात्री राहिला. या दोघांच्या हालचालींवर पाळत ठेवून त्याने इराणी दाम्पत्याच्या हत्येचा प्लान आखला. विजेची वायर कापून चोरी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी इलेक्ट्रीशियन बोलावून ती पूर्ववत करून घेतली. चौथ्या दिवशी नर्गीस या बंगल्यासमोरील बागेत संध्याकाळी वॉकिंग करून बंगल्यात शिरत असताना दरवाज्याच्या वाटेवरच धारदार कटरच्या साहायाने त्यांच्या गळ्यावर सपासप वार करून हत्या केली. दोन्ही कानात सुवर्णफुले असल्याने त्यांच्या कानाच्या पाळी याच कटरच्या सहाय्याने कापल्या. नंतर बंगल्यातील किचनमध्ये नौसिर यांच्या डोक्यावर झाडाच्या फांदीने बनवलेल्या काठीचा जोरदार फटका मारून त्यांची हत्या केली. घरामध्ये असलेली ३० ते ४० हजारांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने घेऊन तो पळून गेला. रात्री साठे आठ - नऊच्या दरम्यान तो वाणगाव स्थानकात ट्रेन पकडण्यासाठी आला. पण सूरतला जाणारी ट्रेन नसल्याने तो पुन्हा बंगल्यावर परतला. पहाटे ४ वाजता वाणगाव रेल्वे स्थानकात येऊन ट्रेन पकडून सुरतला घरी पोहचला.

अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्रपतींशी बोलू का ?
आई - वडिलांची निर्घृण हत्या झाल्याची माहिती अमेरिकेत राहणाºया डॉक्टर मुलाला मिळाल्यावर तो अंत्यविधीसाठी वाणगाव येथे आला होता. अंत्यविधीनंतर दोन दिवस उलटूनही आई - वडिलांची हत्या केलेल्या आरोपीला पोलिसांनी पकडले नाही, म्हणून मुलगा रागात होता. त्याने तपास अधिकारी तत्कालीन बोईसर उपविभागीय अधिकारी विजयकांत सागर यांना सांगितले की, आरोपी पकडत नसाल तर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांच्याशी बोलू का, अशी विचारणा केली. तेव्हा तपास अधिकाºयांनी लवकरात लवकर आरोपी पकडू आणि त्यादिशेने जोरदार तपास सुरू असल्याचे सांगून त्याचा राग शांत केला होता.

या वृद्धाच्या चोरी करण्यात आलेल्या मोबाइलच्या लोकेशनवरून आरोपींला पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपींला सुरत येथून पकडून डहाणू न्यायालयात हजर केल्यावर पोलीस कोठडी मिळाली होती. तपासात पोलिसांना आरोपीने दिलेल्या माहितीमुळे थक्क झाले होते. आरोपीची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली होती. १८ डिसेंबर २०१९ ला पालघर न्यायालयाने आरोपी मोहम्मद रफीक आदम शेख उर्फ रबेन उर्फ रवी रामखिलावसिंग ठाकूर (३१) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या हत्येप्रकरणी न्यायालयात शेवटच्या दोन दिवशी साक्ष सुरू होती. आम्ही केलेल्या तपासातून आरोपी विरोधात सबळ पुरावे सादर केल्याने फाशीची शिक्षा आरोपीला न्यायालय सुनावेल असे वाटत होते पण त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गुन्ह्यात वृद्ध दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या करणाºया आरोपीला योग्य तपास करून शिक्षा झाल्याने खरोखरच समाधान मिळाले. - विजयकांत सागर (अप्पर पोलीस अधीक्षक, वसई विभाग)

Web Title: life-imprisonment to accused for murder of elderly couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.