मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या पित्यास जन्मठेप, 5 गुन्ह्यांत ठोठावली शिक्षा
By नितिन गव्हाळे | Published: November 19, 2022 06:21 PM2022-11-19T18:21:23+5:302022-11-19T18:23:06+5:30
पाच गुन्ह्यांमध्ये ठोठावली शिक्षा: जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
नितीन गव्हाळे
अकोला: घरात कोणी नसताना, स्वत:च्याच मुलीचे बळजबरीने लैंगिक शोषण करून ही बाब कोणाला सांगितल्यास, आई, भावास ठार मारण्याची धमकी देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या ४५ वर्षीय पित्यास विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने शनिवारी पाच गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेसह ५ लाख ३० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
उरळ पोलीस ठाण्यातर्गंत येणाऱ्या गावातील १५ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार ती सकाळी घरकाम करीत होती. तिच्या कुटुंबातील अन्य सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. ही संधी साधुन गुंड प्रवृत्तीच्या पित्याने स्वत:च्या मुलीवर अतिप्रसंग केला व तिला मारहाण करून ही घटना कोणाला सांगितली तिच्या भावास व आईस आणि तिला मारून टाकण्याची धमकी दिली. मुलीने ही बाब घराजवळ राहणाऱ्या काकुला सांगितली. काकुने ही बाब तिच्या आईला सांगितली. त्यानंतर उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी आरोपी पित्याविरूद्ध भादंवि कलम ३७६, ३७६ (२)(एन), ३७६(३), ५०६, पोक्सो कायदा कलम ३-४, ५(एल)(एन), ७-८ नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता उरळचे ठाणेदार अनंत वडतकर यांनी तातडीने कारवाई करून जलदगतीने तपास पूर्ण केला आणि आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षाने ११ साक्षीदार तपासले. साक्ष व पुरावे ग्राह्य मानुन न्यायालयाने आरोपी पित्यास पाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरविले. हा खटला अवघ्या १३ महिन्यात न्यायालयाने निकाली काढला. सहाय्यक सरकारी विधिज्ज्ञ किरण खोत यांनी पीडित मुलीची न्यायालयात बाजु मांडून तिला न्याय मिळवून दिला. पैरवी अधिकारी म्हणून एएसआय रामकृष्ण ढोकणे, सीएमएसचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील यांनी काम पाहीले.