पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला आजन्म कारावास अन् १० हजार रुपयांचा दंड!
By विजय.सैतवाल | Published: July 20, 2024 09:27 PM2024-07-20T21:27:06+5:302024-07-20T21:27:21+5:30
पत्नी झोपलेली असतानाच डोक्यात टाकली होती कुऱ्हाड
जळगाव : पत्नी दुसऱ्यासोबत निघून जाईल या संशयावरुन खाटीवर झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड टाकून खून करणाऱ्या भिकन भाऊराव पवार (रा. वाघडू, ता. चाळीसगाव) याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. १३ जणांची साक्ष, प्रभावी पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने ही शिक्षा सुनावत १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथील भिकन पवार याने पत्नी सोडून दुसऱ्यासोबत निघून जाईल या संशयावरुन १८ मे २०१९ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पवार यांनी पत्नी अन्नपूर्णा पवार घराबाहेर खाटेवर झोपलेली असताना तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले होते. याप्रकरणी पोलिस पाटीलांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गंभीर जखमी असलेल्या अन्नपूर्णा पवार यांचा उपचार सुरु असताना दि. १९ मे २०१९ रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले. तपासधिकारी पोउनि युवराज रबडे यांनी गुन्ह्याचा तपास करीत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
१३ जणांच्या साक्ष
मारेकरी भिकन पवार यांच्याविरुद्ध दाखल असलेला खूनाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यामध्ये पोलिस पाटील, तपासधिकाऱ्यांसह चौघांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या.
मारेकऱ्यावर होता बलात्काराचाही गुन्हा
या घटनेच्या तीन महिन्यांपूर्वीच भिकन पवार याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची बाब सरकारपक्षातर्फे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांसह प्रभावी युक्तीवादावरुन भिकन पवार यानेच खून केल्याची निष्पन्न झाल्यानंतर त्याला दोषी ठरविण्यात आले.
न्या. जे. जे. मोहीते यांच्या न्यायालयाने भिकन पवार याला आजन्म कारावास, १० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून तो न भरल्यास तीन महिने कैदेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. नीलेश चौधरी यांनी काम पाहिले. केस वॉच पोकॉ दिलीप सत्रे तर पैरवी अधिकारी पोलिस नाईक चेतन ठाकरे यांनी सहकार्य केले.