पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेप; कल्याण न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल
By सचिन सागरे | Published: April 27, 2024 03:50 PM2024-04-27T15:50:09+5:302024-04-27T15:51:32+5:30
पैसे देत नसल्याच्या रागातून उचललं होतं टोकाचं पाऊल
सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याच्या रागातून पत्नीला पेटवून देत तिला जिवंत जाळून ठार मारणाऱ्या पती केशव आत्माराम जाधव (रा. लसुणपाडा, आसनगाव) याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर. जी. वाघमारे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
जून २००९ मध्ये आसनगाव येथील लसुण पाडा येथे रहाणाऱ्या पत्नी सावित्रीकडे पती केशवने दारू पिण्याकरिता पैसे मागितले. परंतु, पैसे देण्यास सावित्री यांनी नकार दिला. पैसे देत नसल्याच्या रागातून केशवने सावित्री यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या त्रासाला कंटाळून सावित्री यांनी घरातील रॉकेल अंगावर ओतून घेतले. त्याचवेळी, केशवने माचीसची काडी पेटवून सावित्रीला जाळण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान सावित्रीचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले. या खटल्यात सरकारी वकील संजय गोसावी व वकील कदंबिनी खंडागळे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी सहा. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कुटे, आणि कोर्ट ड्युटी पोलीस शिपाई विलास शिंपी यांनी मदत केली.