पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप; घटस्फोटास नकार दिल्याने गळा दाबून केली होती हत्या
By जितेंद्र कालेकर | Published: January 12, 2023 11:20 PM2023-01-12T23:20:08+5:302023-01-12T23:21:08+5:30
आरोपी हा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा असून, ही घटना २०१६ मध्ये नवी मुंबईत घडली होती.
ठाणे : पत्नीची हत्या करून ती बेपत्ता झाल्याचा बनाव रचणाऱ्या राकेश रमेश नौकुडकर या पतीला ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी जन्मठेपेची शिक्षा अलीकडेच सुनावली. आरोपी हा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा असून, ही घटना २०१६ मध्ये नवी मुंबईत घडली होती.
आरोपीचा सविता हिच्याशी प्रेमविवाह झाल्याने ते नवी मुंबईमध्ये वेगळे राहत होते. खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेला राकेश त्या कंपनीतील एका मुलीच्या प्रेमात पडला. तिच्याशी लग्न करण्यासाठी तो पत्नी सवितावर घटस्फोट देण्यासाठी वारंवार दबाव टाकत होता. मात्र, ती त्यास नकार देत होती. याचाच राग मनात धरून त्याने तिच्या हत्येचा कट रचला आणि गळा आवळून ८ ते १० फेब्रुवारी २०१६ या कालावधीमध्ये तिचा खून केला. पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव केला. कालांतराने १० फेब्रुवारी रोजी एनआरआय कॉम्पलेक्सच्या रोडवर तिचा मृतदेह आढळल्यानंतर नवी मुंबईच्या सागरी पोलिसांनी तपास करून आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले गेले. या खटल्याची न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून मंगळवारी आरोपी राकेश नौकुडकर याला न्यायालयाने दोषी ठरवले. पत्नीच्या हत्येकरिता जन्मठेपेसह एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. तपास अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक प्रमाेद शिंदे यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार आर. एस. काेकरे यांनी काम पाहिले.