राजकीय वैमनस्यातून भाजप कार्यकर्त्याचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा
By जितेंद्र कालेकर | Published: October 4, 2022 08:39 PM2022-10-04T20:39:02+5:302022-10-04T20:39:29+5:30
ठाणे न्यायालयाचा आदेश: भिवंडीतील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: आॅक्टोंबर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपचे मकसूद शेख याने भाजप उमेदवाराच्या प्रचाराचे काम केले होते. याच रागातून त्याचा खून करणाºया अहमद कमाल अब्दुल मोबिन अन्सारी उर्फ पप्पू पुरीवाला याला मंगळवारी ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. भागवत यांनी जन्मठेपेची तसेच पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवसांच्या अतिरिक्त कैदेचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात १० डिसेंबर २०१४ रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास हा खूनाचा प्रकार घडला होता. विधानसभा निवडणूकीच्या वेळी भिवंडी पश्चिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महेश चौगुले हे निवडून आले होते. या निवडणूकीत मकसूद शेख याने चौगुले यांच्या प्रचाराचे काम केले होते. त्यावेळी काँग्रेस आय पक्षाचे उमेदवार शोएब गुडडु हे होते. यामध्ये आरोपी आसीफ शेख आणि आरीफ शेख यांनी काँग्रेसचे उमेदवार शोएब यांच्यासाठी काम केले होते. आपल्या वॉर्डमध्ये आपल्या विरोधात मकसूदने काम केल्यामुळे आसीफ आणि आरीफ हे दोघे त्याच्यावर चिडून होते. यातूनच त्यांनी त्याला प्लंबिंगचा व्यवसाय न करण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर त्यांच्यात वारंवार वेगवेगळया कारणांनी वादही झाले होते.
मकसूदमुळे आपल्या वर्चस्वाला धक्का लागू शकतो, या कारणामुळे आसीफ आणि आरीफ यांनी अहमद मोबीन अन्सारी याच्याशी संधान साधून त्याला मकसूदच्या खूनाचा कट केला. यातूनच मकसूद याच्या घरासमोरील बोअरवेलची नळजोडणी करीत असतांना अहमद अन्सारी याने मकसुदच्या मानेवर, डोक्यावर तोंडावर, बरगडीच्या डाव्या बाजुस, चाकुने वार करून गंभिर त्याचा खून केला. याप्रकरणी अहमदसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यात तिघांनाही अटक झाली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. पी. आहेर यांनी या प्रकरणाचा तपास केला. याच खटल्याची सुनावणी ४ आॅक्टोंबर रोजी ठाणे न्यायालयात झाली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी १९ साक्षीदार तपासून आरोपींना शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडली. मात्र, यातील आरीफ आणि आसिफ या दोघांची निर्दोष मुक्तता झाली. तर अहमदला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.