विष पाजून मित्राचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा
By शरद जाधव | Published: September 1, 2023 08:24 PM2023-09-01T20:24:27+5:302023-09-01T20:54:14+5:30
जिल्हा न्यायालयाचा निकाल; अनैतिक संबंधातून खूनाची घटना
सांगली : अनैतिक संबंधावरून प्रेयसीला त्रास देणाऱ्यास दारूतून विष देवून त्याचा खून करणाऱ्यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. लहू लक्ष्मण मंडले (वय ४१, रा. हणमंतवडीये ता. कडेगाव) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी वकील मेघा पाटील यांनी काम पाहिले.
खटल्याची अधिक माहिती अशी की, २० मे २०२० रोजी नागाव कवठे (ता. तासगाव) जवळ ही घटना घडली होती. मयत सचिनकुमार कांबळे व आरोपी लहू मंडले हे एकमेकांचे मित्र होते. मृत कांबळे याच्या नातेवाईक महिलेशी मंडले याचे अनैतिक संबंध होते. यामुळे मृत कांबळे हा त्या महिलेस त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून दोन आरोपींनी त्याच्या खूनाचा कट रचला होता. त्यानुसार आरोपी लहू याने २० मे रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास कांबळे याला फोन करून दारू पिण्यासाठी बोलावून घेतले. यानंतर त्याला नागाव कवठे येथे नेत तासगाव रोडवरील शेतात नेऊन त्याला दारूमधून तणनाशक मिक्स करून पाजण्यात आले. त्यानंतर कांबळे याच्या तोंडावर मारून गळा दाबून खून करण्यात आला.
आरोपी मंडले हा स्वत:हून तासगाव पोलिस ठाण्यात हजर राहून त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तासगाव पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून मंडले याच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुरूवातीचा तपास सहायक निरीक्षक पंकज पवार यांनी केला तर त्यानंतर उपअधीक्षक अंकुश इंगळे यांनी तपास केला. या खटल्यात एकूण २० साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यातील दुसऱ्या आरोपीचा पुराव्याअभावी निर्देाष मुक्त करण्यात आले. या खटल्यात पैरवी कक्षातील वंदना मिसाळ, सीमा घोलप, सुप्रिया भोसले यांचे सहकार्य लाभले.