विवाहित प्रेयसीची हत्या करणाऱ्यास जन्मठेप; मुंब्य्रातील घटना, ठाणे न्यायालयाचा निकाल
By जितेंद्र कालेकर | Published: July 19, 2023 09:41 PM2023-07-19T21:41:28+5:302023-07-19T21:42:45+5:30
दंड न भरल्यास सहा महिने कठोर कारावासाची अतिरिक्त शिक्षाही या आरोपीला भोगावी लागणार असल्याची माहिती सरकारी अभियोक्ता अनिल लाडवंजारी यांनी बुधवारी दिली.
लोेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : विवाहित प्रेयसीबरोबर झालेल्या भांडणातून तिची हत्या करणाऱ्या अतुल कमलेश सिंग (रा. दिवा, ठाणे) या आरोपीला ठाण्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीश अभय मंत्री यांनी जन्मठेपेची तसेच २० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने कठोर कारावासाची अतिरिक्त शिक्षाही या आरोपीला भोगावी लागणार असल्याची माहिती सरकारी अभियोक्ता अनिल लाडवंजारी यांनी बुधवारी दिली.
या खटल्यातील अविवाहित आरोपी अतुल याचे विवाहितेशी प्रेमसंबंध होते. विवाहित असल्यामुळे संबंध ठेवण्यास ती नकार देत होती. याच कारणावरून दोघांमध्ये २०१७ मध्ये भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून अतुल याने मुंब्रा भागात राहणाऱ्या या विवाहितेच्या घरात शिरून कटर व ब्लेडच्या साहाय्याने तिचा खून केला होता. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक सदाशिव निकम यांच्या पथकाने त्याला अटक केली होती.
सरकारी अभियोक्ता अनिल लाडवंजारी यांनी १२ ते १३ साक्षीदार तसेच पुरावे सादर करून आरोपीला शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडली. पोलिस नाईक विद्यासागर कोळी यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. सर्व बाजूंची पडताळणी झाल्यानंतर न्या. अभय मंत्री यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.