मावस सासऱ्याचा खून करणाऱ्यास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:49 PM2018-08-08T17:49:27+5:302018-08-08T17:51:24+5:30
बुलडाणा : सोयरीक जुळवून देणाऱ्या मावस सासऱ्याची गळा चिरुन हत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस सात आॅगस्ट रोजी जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
बुलडाणा : सोयरीक जुळवून देणाऱ्या मावस सासऱ्याची गळा चिरुन हत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस सात आॅगस्ट रोजी जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तालुक्यातील अटकळ येथील बाबुराव खोंडे यांनी कुलंबखेड येथील गणेश कानडजे वय २६ याची मध्यस्थी करुन सोयरीक जुळविली होती. मात्र पत्नी दिपाली गतीमंद असल्याचा आरोप करीत गणेश फारकतीसाठी नेहमी तगादा लावत होता. परंतू मावस सासरे बाबुराव खोंडे आपल्याला मदत करीत नाहीत त्याचा गैरसमज होता. दरम्यान ४ नोव्हेंबर २०१६ रोजी बाबुराव खोंडे सागवन येथील गायरान परिसरातील नातेवाईकांकडे आले होते. गणेश कानडजेही तेथे उपस्थित होता. दोघांमध्ये फारकतीच्या मुद्दयावरुन वाद झाल्याने गणेश याने बाबुराव खोंडे यांची गळ्यावर वार करुन हत्या केली. मृतकाचा मुलगा विशाल खोंडे याने याबाबत शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली. त्यावरुन कलम ३०२ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे ९ साक्ष नोंदविण्यात आल्या. फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष सर्वात महत्वाची ठरली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायधीशांनी आरोपी गणेश कानडजे यास ७ आॅगस्ट रोजी जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. अमोल बल्लाळ यांनी बाजू मांडली. सरकार पक्षास अॅड. राजेश खुर्दे यांनी सहकार्य केले. हे प्रकरण चालविण्यासाठी पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर कांबळे, गजानन मांटे, न्यायालयीन कर्मचारी विजय काळे यांनी सहकार्य केले.