पहाटे नोकरीला जाणाऱ्या तरुणावर केला जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 07:34 PM2018-07-28T19:34:16+5:302018-07-28T19:35:01+5:30
जखमी झालेल्या सागरच्या मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही; सुरक्षा रक्षकाने त्याला गेटच्या बाहेर जाण्यास सांगितले
मुंबई - घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या खोत लेनमध्ये आज पहाटे 5 वाजताच्यादरम्यान चोरीच्या उद्देशाने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सागर सुरेश हिवरकर असे या तरुणाचे नाव आहे.तो सकाळी 5 वाजता ठाण्याकडे जाण्यासाठी लोकल पकडण्यास घाटकोपर रेल्वे स्थानक येथे जात होता. परंतु खोत लेन येथे त्याला दोन जणांनी अडवले. त्याची बॅग, पॉकेट आणि मोबाईल हिसकावून घेत त्याच्या पोटात आणि हातावर चाकूने हल्ला केला. यात तो गंभीरपणे जखमी झाला आहे. यावेळी अनेक प्रवासी जात - येत होते. परंतु त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. एवढंच काय तर इथे असलेल्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने त्याला मदत करण्याऐवजी गेटच्या बाहेर जाण्यास सांगितले. अखेर कोणीतरी पोलीस नियंत्रण कक्षाला या संदर्भात माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी येऊन या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. परंतु या घटनेमुळे तरुणांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
घाटकोपर पोलिसांनी आरोपी सलमान शेख आणि समीर या दोन आरोपींना अटक केली आहे. सागरवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्याच्या कुटुंबाने केली आहे.