अश्लील व्हाईस मेसेजनंतर गिफ्ट म्हणून पाठविली अंतर्वस्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 03:06 PM2019-08-05T15:06:00+5:302019-08-05T15:17:52+5:30
३६ वर्षीय आरोपीला गोव्यातून बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई - चर्चगेट येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेला अंतर्वस्त्र गिफ्ट म्हणून पाठवणाऱ्या ३६ वर्षीय आरोपीला गोव्यातून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी भारतीय पुरातत्त्व विभागात नोकरी करत असून यापूर्वीही त्याने मेसेजवरून पीडित महिलेला अश्लील व्हाईस मेसेज पाठवला होते. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनीविनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदोष रामकृष्ण नाईक (३६) असं अटक केलेल्या आरोपीचं नावं आहे.
पीडित ३३ वर्षीय महिलेला १५ जून रोजी राहत्या घरी पोस्टाने एक पार्सल आले होते. त्यावर इंग्रजी भाषेमध्ये तुझ्यासाठी विशेष गिफ्ट पाठवले आहे. तीन पॅन्टीज फक्त तुझ्यासाठी, मला विश्वास आहे तुला आवडतील,प्लीज त्या घाल असा अश्लील संदेश लिहिला होता. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित महिलेने पोस्टात चौकशी केली असता ते काळबादेवी येथून आल्याचे उघड झाले आहे. मनात लज्जा उत्पन्न झाल्यामुळे या महिलेने याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे तक्रार केली. पोस्टाकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी प्रदोष रामकृष्ण नाईक (३६) याला गोव्यातील फोंडा परिसरातून अटक करण्यात आली. तपासात आरोपीचे नाव पुढे आल्यानंतर वर्षभरापासून महिलेला मेसेजवरून त्रास देणारा हाच असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नाईक याने या सर्व प्रकरणाची सुरूवात ऑक्टोबर २०१८ मध्ये केली होती. पीडित महिला मरिन ड्राईव्ह येथे कुत्र्याला फिरवण्यासाठी आणि मार्निंग वॉकसाठी आली होती. त्यावेळी एक व्यक्ती तिच्या मागेपुढे येरझऱ्या घालत होता. त्यावेळी त्याने कुत्र्याबाबत विचारत विचारत महिलेशी ओळख करून तिचे नाव विचारले होते. त्यानंतर महिलेच्या लॅंडलाईन दूरध्वनी करून आणि मोबाईलवरून व्हॉट्स अॅपवरून ओळख वाढवण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी त्याने पाठवलेल्या फोटो व नावावरून मरिन ड्राईव्ह येथे महिलेमागे येरझऱ्या घालणाऱ्या तोच व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले. आपण बीबीसीआयचा पहिल्या दर्जाचा पंच असल्याचा दावाही केला होता. महिलेने व्हॉट्स अॅपवर त्याला ब्लॉक केले. त्यानंतर तिने स्वतःचा मेसेंजर पाहिला असता आरोपीकडून अनेक व्हीडिओ कॉल आणि व्हाईस मेसेजही आले होते. या सर्व प्रकारानंतर घाबरलेल्या महिलेने आरोपीचे सर्व संदेश सीडीवर साठवून ठेवले होते. त्यांनतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी टपाल खात्याकडे या महिलेला आलेल्या पार्सलबाबतची माहिती मागवली. त्यावेळी तो गोव्यातील वास्को रेल्वे स्थानकाजवळील पोस्टातून पाठवण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आरोपीपर्यंत पोहोचला. आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर गोव्यातील वास्को येथील कामाच्या ठिकाणी गेलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीअंती त्याला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी शनिवारी अटक केली. चौकशीत आरोपीने महिलेला वास्को येथील टपाल कार्यालयासह मुंबईतील जीपीओ येथूही अंतर्वस्त्र पाठवल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
मुंबई - महिलेला गिफ्ट म्हणून अंतर्वस्त्र पाठवणाऱ्या व्यक्तीस गोव्यातून अटक @mumbaipolicehttps://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) August 5, 2019