व्हॉट्सॲप मेसेजमधील लिंक उघडली अन् क्षणार्धात २१ लाख रुपये गायब!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 08:19 AM2022-08-25T08:19:10+5:302022-08-25T08:19:26+5:30
मोबाइलवर एक व्हॉट्सॲप संदेश व त्याबरोबर एक लिंक आली. ती लिंक उघडताच एका निवृत्त शिक्षिकेच्या बँक खात्यातून २१ लाख रुपये लंपास करण्यात आले.
अण्णामय्या :
मोबाइलवर एक व्हॉट्सॲप संदेश व त्याबरोबर एक लिंक आली. ती लिंक उघडताच एका निवृत्त शिक्षिकेच्या बँक खात्यातून २१ लाख रुपये लंपास करण्यात आले. आंध्र प्रदेशातील अण्णामय्या जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
वरलक्ष्मी असे या निवृत्त शिक्षिकेचे नाव असून, त्यांना मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून एक व्हॉट्सॲप संदेश आला. त्यात एक लिंक दिलेली होती. वरलक्ष्मी यांनी ती लिंक उघडताच त्यांचा फोन हॅक झाला. त्यांच्या बँक खात्यातून २१ लाख रुपये काढून घेण्यात आले. इतकी मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वरलक्ष्मी यांनी पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी सायबर पोलीस तपास करत आहेत.
अज्ञात व्यक्तींनी वरलक्ष्मी यांच्या बँक खात्यातून आधी २० हजार, मग ४० हजार रुपये व त्यानंतर ८० हजार रुपये काढले. मग टप्प्याटप्प्याने
एकूण २१ लाख रुपयांवर डल्ला मारला.
यासंदर्भात पोलीस अधिकारी मुरलीकृष्णा यांनी सांगितले की, अण्णामय्या जिल्ह्यातील मदनपल्ली येथील रहिवासी असलेल्या निवृत्त शिक्षिका वरलक्ष्मी यांनी व्हॉट्सॲपवर आलेल्या संदेशाबरोबर असलेली लिंक अनेकदा उघडली. त्यामुळे प्रत्येक वेळा त्यांच्या बँक खात्यातून पैसे लंपास करण्यात आले. त्यांचा फोन हॅक करण्यात आला होता. या प्रकारानंतर काही वेळाने खात्यातून २१ लाख रुपये वळते झाल्याचे त्यांना एसएमएस आले. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार केली.
सॉफ्टवेअर कर्मचाऱ्यालाही घातला गंडा
मदनपल्ली येथील ज्ञानप्रकाश व्यक्तीलाही काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपवर एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला होता. त्यात दिलेली लिंक उघडल्याने ज्ञानप्रकाश यांच्या बँक खात्यातील १२ लाख रुपये अज्ञात व्यक्तींनी लंपास केले होते. ज्ञानप्रकाश हे सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या झालेल्या फसवणूक प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.