काकाला वाचवा! दारुबंदी कायद्यात पुतण्याला अडकवायचे होते; पोलखोल झाली, बडा अधिकारीच अडकला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 12:44 PM2022-01-21T12:44:25+5:302022-01-21T12:45:07+5:30
Crime news Bihar: काका-पुतण्यामध्ये जुना कौटुंबिक वाद सुरु आहे. पुतण्याला अडचणीत आणण्यासाठी काकाने अनेकदा आपली ताकद वापरली. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नाही.
बिहारमध्ये दारुबंदीवर कठोर कायदा आहे. तरीही लोक सोडा विधानसभेतील अधिकारी, लोकप्रतिनिधी दारु पित असल्याचे फोटो गेल्या महिन्यात समोर आले होते. विधानसभा आवारात दारुच्या बाटल्यांचा खच सापडला होता. याच दारुमुळे बिहार सरकारचा एक बडा अधिकारी पुरता अडकला आहे. पुतण्यासाठी जाळे रचले होते, त्यात तो स्वत:च अडकला आहे.
पुतण्या एक औषधांचा व्यापारी आहे. तर गिरेंद्र मोहन हा बिहार सरकारच्या कृषी विभागात मोठा अधिकारी आहे. काका-पुतण्यामध्ये जुना कौटुंबिक वाद सुरु आहे. पुतण्याला अडचणीत आणण्यासाठी काकाने अनेकदा आपली ताकद वापरली. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नाही. पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात खोटे गुन्हेदेखील दाखल करण्यात आले. मात्र, पोलिसांनी ते सिद्ध करत पुतण्याला संरक्षण दिले. एकसोएक प्रकार करूनही पुतण्या बधत नाही हे पाहून या अधिकाऱ्याने त्याला दारुबंदी कायद्यात अडकविण्याचा प्लॅन आखला.
दोघांचेही मूळ घर एकच होते. एके दिवशी या अधिकाऱ्याने आपल्या घरात दारुच्या बाटल्या आणून ठेवल्या आणि पोलिसांना फोन करून पुतण्या दारुची तस्करी करत असल्याची टिप दिली. पोलीस आणि महसूल विभागाचे पथक तिथे पोहोचले, रात्रीच छापा मारण्यात आला. तेव्हा घरातून देशी दारुच्या कॅनसह विदेशी दारुच्या बाटल्यादेखील सापडल्या. मात्र, दारुच्या तस्करीचे हातखंडे माहिती असलेल्या एका महसूल अधिकाऱ्याला काहीतरी खटकले. त्याने तपास सुरु केला तेव्हा त्याला खळबळजनक पुरावा सापडला.
छापा पडला तेव्हा काका तिथेच उभा होता. अधिकाऱ्यांनी ज्या फोनवरून फोन आला होता त्यावर फोन लावला, तेव्हा काकाचा फोन वाजला. काकाचा फोन ताब्यात घेतला तेव्हा दुधवाल्याशी झालेले संभाषण हाती लागले आणि सारी पोलखोलच झाली. काकाने दुधवाल्याकडून दारुची व्यवस्था केली होती. त्यानंतर त्याने या बॉटल आणि कॅन घरात लपविले होते. दुधवाल्याने पोलिसांचा हिसका मिळताच भडाभडा सत्य सांगितले. आता काकाच या दारुबंदी कायद्यात अडकला आहे.