अॅम्ब्युलन्सला पोलिसांची गाडी समजून दारू तस्करांच्या नदीत उड्या, दोन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 01:35 PM2022-12-21T13:35:28+5:302022-12-21T13:38:17+5:30
बुधवारी संबंधित दारू तस्करांनी अॅम्ब्युलन्सला पोलिसांची गाडी समजून बाईकसह धर्मावती नदीत उड्या घेतल्या होत्या.
बिहारमध्येदारूबंदी असतानाही सर्रासपणे तस्करी सुरू आहे. रोहतास जिल्ह्यातील कोचस पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दारू घेऊन जाणाऱ्या दोन तस्करांनी अॅम्ब्युलन्सला पोलिसांची गाडी समजून नदीत उडी घेतली. या घटनेत पाण्यात बुडून एका तस्कराचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. पण, रुग्णालयात नेताना त्याचाही रस्त्यातच मृत्यू झाला.
ही घटना कोचस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सासाराम-चौसा रोडवर घडली. भगतगंज भागीरथा जवळ बुधवारी संबंधित दारू तस्करांनी अॅम्ब्युलन्सला पोलिसांची गाडी समजून बाईकसह धर्मावती नदीत उड्या घेतल्या होत्या. यात गंभीर मार लागल्याने आणि पाण्यात बुडून एका तस्कराचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. त्याला जख्मी अवस्थेतच कोचस पीएसीमध्ये नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत त्याला चांगल्या उपचारांसाठी वाराणसीला रेफर केले. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दारू तस्क उत्तर प्रदेशातून गारा पथमार्गे दारू घेऊन जात होते. मृतांमध्ये धनसोई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरवनियां येथील अरुण सिंह, तसेच दिनारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरवर येथील दीपक यादवचा समावेश आहे. नदीतून प्लास्टिक बॅगसह दारू जब्त करण्यात आली आहे. दिनारा पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.