ट्रकसह ७२ लाखांची दारू पळविली; तिघांना ५ दिवसांची पोलिस कोठडी
By राजकुमार जोंधळे | Published: May 17, 2024 11:14 PM2024-05-17T23:14:37+5:302024-05-17T23:14:45+5:30
चाकूर न्यायालयात तिघांना हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
लातूर : धर्माबाद (जि. नांदेड) येथून ७२ लाखांची विदेशी दारूचे बॉक्स घेऊन कोल्हापूरकडे निघालेला ट्रक चाकूर ते बोरगाव काळेदरम्यान चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. दरम्यान, यातील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जीपसह अटक केली. चाकूर न्यायालयात तिघांना हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी सांगितले, धर्माबाद येथून कोल्हापूरकडे निघालेल्या विदेशी दारूचा ट्रक चाकूर ते आष्टामोडदरम्यान जीप आडवी लावून थांबविला. यावेळी चार ते पाच जणांना ट्रकमध्ये घुसखोरी केली. चकूचा धाक दाखवून स्टिअरिंगवर ताबा मिळवला. त्यांच्यावर चादर टाकण्यात आली. हा ट्रक बार्शी महामार्गावरील बोरगाव काळे येथे आणण्यात आला.
ट्रकमधील चालकासह इतरांना खाली उतवण्यास सांगितले. महामार्गालगतच्या शेतात दोरखंड, शर्टने त्यांचे हातपाय बांधले. दारूसह तो ट्रक पळविला. याबाबत चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दरोडेखोरांचा माग काढला असता तुळजापूर-धाराशिव महामार्गावरील तामलवाडी नजीक १२ मे रोजी तो ट्रक रिकाम सापडला. यातील दारूचे बॉक्स दरोडेखोरांनी लंपास केले होते.
या टोळीतील चौघांना पांढऱ्या रंगाच्या जीपसह वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केली आहे. यातील एकाला गुरुवारी तर दोघांना शुक्रवारी चाकूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तत्रय निकम करत आहेत.
ट्रकला जीपीएस यंत्रणा नसल्याने झाली अडचण...
धर्माबाद येथील ट्रक मालकाने जीपीएस यंत्रणा बसविली नसल्याने ट्रक शोधण्यात अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी मात्र या ट्रकचा माग काढत सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील तामलवाडी गाठले. या परिसरात दारूचे बॉक्स लंपास करून रिकमा ट्रक थांबविण्यात आल्याचे समोर आले, तर दोन दिवसांनंतर विदेशी दारूसह चाैघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता...
चाकूर-आष्टामोड मार्गावर पांढऱ्या रंगाची जीप ट्रकसमोर आडवी लावून दारूचा ट्रक पळविणाऱ्या टोळीतील दरोडेखोरांची संख्या सात ते आठ असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. यातील चैघांच्या मुसक्या आवळल्या असून, इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. त्यांनी इतर ठिकाणी गुन्हे केले आहेत का? याचीही माहिती संकलित केली जात आहे.