ऐकावे ते नवलंच! चविष्ठ खाद्यपदार्थांसाठी मुलाने सोडले घर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 09:40 PM2019-01-18T21:40:54+5:302019-01-18T21:47:01+5:30
फक्त गावाच्या नावावरून रेल्वे पोलिसांनी पोहोचविले घरी
मुुंबई - चविष्ठ खाद्यपदार्थांच्या आशेने रेल्वे प्रवास करून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहोचलेला गतिमंद मुलगा अखेर आपल्या घरी परतला आहे. मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी या मुलाला झारखंड येथील मनिका या गावी सोडत कुटुंबियाच्या ताब्यात दिले.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकामधील उपनगरीय लोकलमध्ये घाबरलेल्या आणि गांगरलेल्या अवस्थेत विनापालक १७ वर्षीय मुलगा लोहमार्ग पोलीस कर्मचाºयाला निदर्शनास आला. यावेळी त्याच्या हालचाली आणि वर्तन पाहून मुलगा गतिमंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलाचे संरक्षण आणि काळजीपोटी पोलीस कर्मचाऱ्याने त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरीता पोलीस ठाण्यात आणले.
मुलगा अल्पवयीन आणि घाबरलेल्या अवस्थेत असल्याने काहीही बोलत नव्हता. फक्त त्याने ‘मनिका’ या ठिकाणी राहतो एवढेच सांगितले. मुलाकडून मिळालेल्या मनिका नामक ठिकाणावरून मुलगा कोणत्या प्रांतातला आहे, हे उलगडणे कठिण होते. मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मनिका ठिकाणाचा शोध घेतला. तेव्हा झारखंड राज्यात लतेहार या जिल्हामध्ये मनिका हे गाव असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा मनिका येथील स्थानिक पोलीस ठाण्यांशी संपर्क केल्यावर एक महिन्याअगोदर हा मुलगा हरवल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली होती.
८ डिसेंबर रोजी हा मुलगा खाऊकरिता घरातून पैसे घेऊन बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी न परतल्याने कुटुंबियांकडून नंदलाल शंकर प्रसाद (१७) हरविला असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांच्यावतीने त्याला सुखरूप कुटुंबियाकडे देण्यात आले आहे.