गोठ्याच्या प्रस्ताव मंजुरीसाठी लाच, पशुधन विकास अधिकारी जाळ्यात; औशात दोघांवर गुन्हा

By आशपाक पठाण | Published: February 27, 2024 10:20 PM2024-02-27T22:20:08+5:302024-02-27T22:21:04+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Livestock Development Officers in the net for bribing cattle proposal approval; A crime against both of them | गोठ्याच्या प्रस्ताव मंजुरीसाठी लाच, पशुधन विकास अधिकारी जाळ्यात; औशात दोघांवर गुन्हा

गोठ्याच्या प्रस्ताव मंजुरीसाठी लाच, पशुधन विकास अधिकारी जाळ्यात; औशात दोघांवर गुन्हा

आशपाक पठाण, लातूर : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पशुधन गोठ्याचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी व त्याचे पैसे मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारल्याप्रकरणी औसा पशुधन विकास अधिकारी हिरालाल गणपतराव निंबाळकर आणि उंबडगा (बु.) ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालक माधव संग्राम येवतीकर यांना लाचलुचपत विरोधी पथकाने ताब्यात घेतले. तसेच औसा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही मंगळवारी रात्री सुरु होती.

तक्रारदार व त्यांच्या आईच्या नावे औसा तालुक्यातील मौजे सत्तधरवाडी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पशुधन गोठ्याचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी व त्याचे पैसे मंजूर करण्यासाठी औसा येथील पशुधन विस्तार अधिकारी कार्यालय (विस्तार) येथे कार्यरत पशुधन विकास अधिकारी (वर्ग-1) हिरालाल गणपतराव निंबाळकर यांनी १ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मंगळवारी तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली. यामध्ये निंबाळकर यांनी लाचेची रक्कम संगणक परिचालक माधव येवतीकर यांच्याकडे देण्यास सांगितली. औसा पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेमध्ये शासकीय पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताच येवतीकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले. तसेच निंबाळकर यांना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक संतोष बर्गे करीत आहेत.

नांदेड परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे व अपर पोलीस अधीक्षक रमेशकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर, पोलीस हवलदार फारूक दामटे, भागवत कठारे, शाम गिरी, भीमराव आलुरे, पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर कच्छवे, संदीप जाधव, दीपक कलवले, गजानन जाधव, संतोष क्षीरसागर यांनी ही कारवाई पार पाडली.

Web Title: Livestock Development Officers in the net for bribing cattle proposal approval; A crime against both of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर