लाखो रुपयांचे गँस सिलेंडर चोरणारे चोरटे गजाआड a
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 05:44 PM2019-04-26T17:44:36+5:302019-04-26T17:46:58+5:30
फुरसुंगी येथील गँस गोडावून येथून गँस सिलेंडरची चोरीला गेल्याची घटना घडली होती.
पुणे : फुरसुंगी येथील गँस गोडावून येथून गँस सिलेंडरची चोरी करणा-या दोन चोरटयांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 29 सिलेंडर व 2 टेम्पो असा 3 लाख 98 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जयसिंग उर्फ गोरख विलास सावंत (वय 38, रा.भेकराईनगर, जुना फुरसुंगी रस्ता, हरपळे वस्ती) सियाराम काशि चौहान (वय 26, रा. भारत गोडावून समोर फुरसुंगी) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 21 एप्रिल रोजी फुरसुंगी येथील समर्थ भारत गँस खुटवड गोडावून च्या पाठीमागे 25 गँस सिलेंडर व एक पँगो रिक्षा चोरीला गेल्याचा गुन्हा हडपसरच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला आहे. भेकराईनगर व ढमाळवाडी या भागात एक हिरव्या रंगाचा टेम्पो फिरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व पोलीस नाईक अनिल कुसाळकर यांना खब-याने दिली. त्यानंतर त्यांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची क बुली दिली. यात आरोपी सियाराम चौहान हा बिहार राज्यातला असून तो गोडावून मध्ये लोडींग अनलोडींगचे काम वर्षभरापासून करत होता. त्यामुळे त्याला गोडावूनची पूर्ण माहिती होती. तसेच जयसिंग उर्फ गोरख विलास सावंत हा पंधरा नंबर येथील साहिल एच पी गँस एजन्सीमध्ये मागील दहा वर्षांपासून गँस डिलेव्हरीचे काम करीत होता. गोरख सावंत याची स्वत:ची पँगो गाडी असून त्यावर एचपी गँसचा लोगो आहे. दोन्ही आरोपींचा मागील दोन महिन्यापूर्वी एका कामानिमित्त ओळख झाली होती. त्यांनी सर्व माहिती काढून त्यानुसार गँस सिलेंडर चोरण्याचा प्लँन बनविला. त्यानुसार त्यांनी 21 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता गोडावून मध्ये कोणीच नसताना दोन्ही आरोपींनी सिलेंडरची भरलेली गाडी त्याठिकाणाहून चोरी केली. त्यानंतर सावंत याने चोरीच्या गाडीतील सिलेंडर आपल्या गाडीत भरले. व चोरीची गाडी एका ठिकाणी लपवून ठेवली. दोन दिवसानंतर सावंत याने कोणाला संशय येऊ नये म्हणून स्वत:च्या गाडीत गँस सिलेंडर भरुन एचपी गँस एजन्सीचा डेÑस परिधान केला आणि हडपसर भागातील हॉटेल चालक व नागरिकांना एक्स्ट्रा सिलेंडर कमी किंमतीत विकले. यावेळी ते पकडले गेले. त्यांच्याकडून दोन टेम्पो व एकूण 29 सिलेंड्र असा 3 लाख 98 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पुणे शहर परिमंडळ 5 चे पोलीस उपआयुक्त प्रकाश गायकवाड, यांच्या सुचनेनुसार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक हेमराज कुंभार, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.